मोस्ट वॉन्टेड मोलकरणीचा पवईत दुसरा मोठा डल्ला

वईत घरकामासाठी मोलकरीण म्हणून काम मिळवून काही तासातच घरात असणाऱ्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करून पवईत दहशत पसरवणाऱ्या, मोस्ट वॉन्टेड मोलकरणीने गेल्या आठवड्यात हिरानंदानीमध्ये आपला दुसरा डल्ला मारत, एका मोठ्या रकमेवर हात साफ केला आहे. यापूर्वी तिने लेकहोम येथील एका इमारतीत मोठा डल्ला मारला होता. पवई पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद करून विशेष पथक तयार करून या महिलेचा शोध सुरु केला आहे.

हिरानंदानी येथील क्लिफ एव्हेन्यू रोडवर राहणारे विश्वास इनामदार (बदललेले नाव) यांना घरकामासाठी बाईची गरज असल्याचे त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना सांगितले होते. २६ फेब्रुवारीला एक महिलेने त्यांच्याकडे येवून आपली ओळख ज्योती जाधव अशी करून देत, तिला इनामदार यांचे वरळी येथील नातेवाईकांनी घरकामासाठी पाठवले असल्याचे सांगितले. इनामदार यांनी तिच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, उद्या घेवून येते असे त्यांना सांगण्यात आले. इनामदार यांचा तिच्यावर विश्वास झाल्यावर, त्या दिवशी घरकाम करून ती संध्याकाळी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ती पुन्हा कामाला आली आणि काम करून ११ वाजता पुन्हा निघून गेली. मात्र ती निघून गेल्यावर इनामदार यांच्या पत्नीच्या लक्षात आले कि, त्यांचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेल्या ठिकाणावरून गायब आहे.

चोरीची खात्री होताच इनामदार यांनी पवई पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे.

“घरकामासाठी आलेल्या त्या महिलेने पहिल्या दिवशी काम करताना घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत याची माहिती मिळवली होती. ज्याच्या आधारावर दुसऱ्या दिवशी तिने घरातील कपाटातील हिऱ्याचे आणि सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाची रोख रक्कम चोरून, मोठा हात मारून तेथून पलायन केले” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, “आम्ही इनामदार व त्यांच्या पत्नीला आधीच्या एका चोरीच्या गुन्ह्यातील महिलेचे फोटो दाखवले असता, त्यांच्या घरी चोरी करणारी महिला मोलकरीण सुद्धा तीच असल्याचे त्यांनी ओळखले. सदर महिलेने २६ डिसेंबर २०१७ रोजी लेकहोम सोसायटीत अशाच प्रकारे चोरी करून मोठा डल्ला मारला होता.”

सदर महिला मुंबईतील विविध भागात आपल्या या कार्यपद्दतीने अजूनही काही गुन्हे करण्याची शक्यता आहे; तेव्हा नागरिकांनी जागरूक राहत, सदर महिला कुठे दिसून आल्यास किंवा काम मागण्यासाठी आल्यास पवई पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन पवई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes