पवईत म्हाडा इमारतीत घरकाम करणाऱ्या महिलेला मारहाण

– रमेश कांबळे, अविनाश हजारे

आरोपी इसम पिडीत महिलेला मारहाण करतानाचे सिसिटीव्ही फुटेज

पवईतील म्हाडा, पवई लेकहाईटस इमारतीत घरकाम करणाऱ्या एका महिलेला इमारतीत राहणाऱ्या इसमाने मारहाण केल्याची घटना रविवारी पवईत घडली आहे. घरकामास येण्यास मनाई केल्याने तिला मारहाण करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत.

ईश्वरा नायडू (बदललेले नाव) या नीटी, फुलेनगर परिसरात राहत असून, पवईतील रामबाग परिसरातील म्हाडा भागातील इमारत क्रमांक ६ मधील काही घरात घरकाम करतात. सोमवार, ५ मार्च रोजी त्यांनी येथील इमारत क्रमांक ५ (पवई लेकहाईट) मधील बाराव्या मजल्यावर असणाऱ्या एका घरात स्वयंपाक बनवण्याचे काम स्वीकारले होते. याच माळ्यावर राहणारे बक्षी यांनी तिला त्यांच्या घरी सुद्धा कामाला येण्यास सांगितले, मात्र तिने जमणार नसल्याचे सांगितले.

दोन दिवसानंतर आपले काम संपवून निघत असताना, बक्षी यांनी माझा उजवा हात पकडून “तुम चलो मेरे साथ, मेरे घर मे भी काम है” असे म्हटले, मात्र मी नकार देवून हात झटकून तिथून निघून गेली. त्यावेळी त्यांच्या घरात काम करणारी बाई सुद्धा तेथे उपस्थित होती. दोन दिवसांनी याबाबत मी इमारतीचा वॉचमन आणि सेक्रेटरी यांना सांगितले. असे पोलीस जवाबात ईश्वराने सांगितले आहे. (एफआयआरची कॉपी आवर्तन पवईच्या ताब्यात आहे)

आरोपी इसम पिडीत महिलेला लाथेने मारहाण करतानाचे सिसिटीव्ही फुटेज

“दोन दिवसानंतर पुन्हा मी काम करून निघत असताना बक्षी यांनी लिफ्टजवळ मला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मी शिड्यांवरून तिथून पळ काढला, असे आवर्तन पवईशी बोलताना ईश्वरा यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “१८ मार्चला १२ वाजण्याच्या सुमारास मी इमारत क्रमांक ५ मध्ये कामासाठी जात असताना बक्षी लॉबीमध्येच उभे होते. मी लिफ्टजवळ जाताच, शिव्या देत माझ्याकडे धावत आले आणि मला मारहाण करायला सुरुवात केली.”

ईश्वरा जखमी झाली असल्याची माहिती मला समजताच मी तिला बघायला आली असता, तिने घडलेली सगळी हकीकत मला सांगितली. ज्यानंतर आम्ही पवई पोलीस ठाण्यात जावून याबाबत माहिती दिली असल्याचे तिची मैत्रीण गुरव यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

“आम्ही भादवि कलम ३५४ (स्त्री चा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे), ३३७ (जीवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारया कृतीने दुखापत पोहचवणे), ३२३ (इच्छापुर्वक दुखापत पोहचवण्याबद्दल शिक्षा), ५०४ (शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे) नुसार गुन्हा नोंद करून सदर आरोपीचा शोध सुरु आहे असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गरीब कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत.  सदर घटनेत गंभीर गुन्ह्याची नोंद करून तत्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी महानगर घरेलू महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा शालिनीताई पानखडे यांनी केली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes