शिव-भगतानी रोडला खड्डे; खाजगी रोड असल्याचे सांगत पालिकेचे दुर्लक्ष

आवर्तन पवई | पवई – चांदिवली

चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा शोर्टकट रोड शिवभगतानी कॉम्प्लेक्समधून जात आहे. या रोडवरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. कॉम्प्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विकासकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, रस्ता खाजगी असूूून विकासकाने पालिकेच्या स्वाधिन केला नाही असे सांगून पालिका याच्यातून हात झाडत असल्याने येथील नागरिकांना आता खड्यातून प्रवास करण्याव्यतिरिक्त पर्यायच उरलेला नाही.

चांदिवली व हिरानंदानी याच्या मधल्या भागात ‘जयसी होम’ या विकासक कंपनीच्यावतीने एका मध्यम कॉम्प्लेक्सचे निर्माण केले गेले आहे. या कॉम्प्लेक्सच्या निर्मितीवेळी विकासकाने चांदिवली आणि हिरानंदानी अशा दोन्ही बाजूला लोकांसाठी एक्सेस तयार केला होता. सुरुवातीला काही निवडक वाहने येथून ये-जा करत असत. मात्र हळूहळू येथे विकासकाने एक छोट्याशा कॉम्प्लेक्सची निर्मिती करताच प्रभावी रहिवाशी आणि वाहने यांची संख्या सुद्धा येथील रस्त्यांवर वाढू लागली.

सुरुवातीला कॉम्प्लेक्सच्या चांदिवली आणि एस एम शेट्टी शाळा दोन्ही बाजूला रस्ता खराब असल्याने काही निवडक वाहनेच या कॉम्प्लेक्समार्गे प्रवास करत असत. म्हाडा आणि पालिका यांच्या वादात अडकून पडलेल्या रोडबाबत स्थानिक प्रतिनिधीच्या मदतीने प्लानेट पवईने पाठपुरावा करत तत्कालीन म्हाडा प्रमुख खोब्रागडे यांच्या माध्यमातून म्हाडाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून पालिकेला सोपवत या रस्त्याची निर्मिती करून घेतली होती.

रस्त्यावर वाढती वाहने आणि शोर्टकट मार्ग पाहता चांदिवली भागात जाणाऱ्या आणि हिरानंदानीकडे येणाऱ्या अनेक वाहनांनी सोयीस्कर पडणाऱ्या शिवभगतानी मार्गाचा वापर करणे सुरु केल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढून वाहतूक कोंडी तर वाढलीच मात्र रस्त्याची सुद्धा दुरावस्था झाली आहे.

“विकासकाची बरीच कामे आजकाल ठप्प पडली आहेत. येथे पूर्वी बनवण्यात आलेल्या इमारतीच्या निर्मितीच्या वेळी खरेदीदारांना देण्यात आलेली आश्वासने विकासकाने पाळली नसल्याने त्यांच्या विरोधात आधीच तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यातच त्याचे या भागात सुरु असणारे भगतानी क्रीशांग नामक इमारतीचे काम सुद्धा अर्ध्यातच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकाने येथे दुर्लक्ष करत पळ काढला आहे” असे काही स्थानिक नागरिकांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

“विकासकाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असून, पालिका हा रोड आम्हाला हस्तांतरित करण्यात आलेला नाही असे सांगून आपले हात झाडत आहे. वेळोवेळी आम्ही या रस्त्यावर पडणारे खड्डे फेडरेशनच्यावतीने आणि अनेकदा स्व-खर्चाने ठीक करत असतो, मात्र त्याचा काहीच फायदा होत नाही, या मार्गाने होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे काहीच दिवसात पुन्हा खड्डे पडतात. ठोस उपाययोजना म्हणून संपूर्ण रस्त्याच्या पुनर्निर्मितीचे काम करणे आवश्यक आहे” असे याबाबत बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष चटर्जी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “विकासक दुर्लक्ष करत असल्याने आम्ही स्वतः पालिकेला, नगरसेवकांना व आमदारांना हा रोड ‘महापालिका अधिनियम ६३ के’ अंतर्गत बदलून रस्त्याची निर्मिती करणारे आणि पाठपुरावा करणारे पत्रव्यवहार सुद्धा पालिकेच्या ‘एल’ विभागात करण्यात आले आहेत, मात्र पालिका सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतेय असे दिसतेय.”

“या प्रश्नाबाबत मी पालिका सहाय्यक आयुक्त यांना पत्र देवून पालिका अधिनियम ६३ के’ अंतर्गत रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी केली आहे” असे याबाबत बोलताना आमदार नसिम खान आणि माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी बोलताना सांगितले.

याबाबत जयसी होम या विकासक कंपनीचे विकासक भगतानी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी आमचा फोन स्विकारला नाही.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!