मानवी साखळीच्या माध्यमातून पवईकरांची कुलभूषण जाधवांच्या सुटकेची मागणी

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर देशभरातून सेलिब्रिटींजसह सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून आपला निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी सकाळी पवईकरांनी हिरानंदानी येथील सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर ‘मानवी साखळी’ करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली. यात जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा सहभाग होता.

पवईकर व माजी नौदल अधिकारी असणारे कुलभूषण जाधव यांनी मुदतीपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. याच कामानिमित्त इराण येथे ते गेले असताना, गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने त्यांना अटक केली होती.

भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा व कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

विजय कनोजिया

देशाच्या कानाकोपऱ्यातून जाधव यांना पाठींबा मिळू लागला आहे. ठिकठिकाणी जनता आपआपल्या पद्दतीने निषेध नोंदवत शिक्षेचा विरोध करत शासनाकडे त्यांना सुखरूप परत आणण्याची मागणी करत आहेत.

गुरुवारी संपूर्ण पवईकरांनी कुलुभूषण यांच्या राहत्या इमारतीच्या समोर हाताला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत त्यांच्या शिक्षेच्या विरोधात मूक निषेध नोंदवला. यावेळी “bring back Mr Kulbhushan Jadhav”, “पवई कि शान, देश कि आन श्री कुलभूषण जाधवको बरी करो”, “राष्ट्रप्रेमी कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करा” असे संदेश देणारे फलक दाखवत शासनाला जाधव यांना मायदेशी परत आणण्याची मागणी केली.

यावेळी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पवईकरांसोबतच जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा उपस्थित होता.

“शिक्षण अर्धवट सोडून घरोघरी इस्त्रीचे कपडे पोहचवणाऱ्या मला जाधव कुटूंबियांनी आर्थिक आणि मानसिक हात दिला. माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या कुटूंबाने उचलल्याने विज्ञान शाखेतून मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो. जाधव हे मला नेहमीच प्रेरणा देत.”- विजय कनोजिया

तो पुढे म्हणाला, “सध्या मी ‘सीडीएस’साठी प्रयत्नशील आहे हे सुद्धा त्यांच्यामुळेच. गेल्या वर्षी जानेवारीत आमची भेट झाली होती. जवळपास एक तास आमच्या गप्पा झाल्या, ज्यात ते मला सतत भविष्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देत होते. आज त्यांच्या अटकेने आणि शिक्षेने माझ्या सारख्या तरुणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा महान आणि चांगल्या व्यक्तीला पाकिस्तान सारख्या देशात ठेवणे योग्य नाही, म्हणूनच मी माझ्या मित्रांसोबत मिळून शासनाला सह्यांचे पत्र देणार आहे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes