आयआयटी – पवईमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असून, सुसाईड नोट मिळून आलेली नाही. पवई पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास करत आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हा कॅम्पसमध्ये हॉस्टेल क्रमांक १६-ब’मधील रूम नंबर ८०२ मध्ये राहत होता. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर जात तेथून उडी मारून आत्महत्या केली. खाली काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून सुरक्षारक्षकाने पाहिले असता त्याला विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

“सुरक्षारक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याला त्वरित कॅम्पसमध्ये असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तपासून त्याला दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगितले,” असे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्हाला त्याच्या जवळ किंवा त्याच्या रुममध्ये कोणतीही सुसाइड नोट मिळून आलेली नाही. आम्ही त्याचा लॅपटॉप ताब्यात घेतला असून, तपासणीसाठी पाठवत आहोत. वर्गमित्रांनी माहिती दिली की, तीन महिन्यांपूर्वी त्याने प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा शनिवारी संपल्या आणि त्या परीक्षेला तो बसला होता.”

प्रथमदर्शनी त्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रिफ्युजी एरियाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारली असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेबाबत विद्यार्थ्याच्या पालकांना कळवण्यात आले असून, ते मुंबईला येण्यास निघाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षारक्षक, वर्गमित्र यांचा जवाब नोंदवून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!