पवईतील संरक्षक भिंत आणि दरडीचा प्रश्न ऐरणीवरच, पालिकेने उचलले हात

@रविराज शिंदे, रमेश कांबळे

इंदिरानगर येथे दरड कोसळण्याच्या संभवणारा धोका आणि आसपास असणारी वस्ती

पवईतील डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असून, वस्त्यांमधील संरक्षक भिंतचा प्रश्न सुद्धा येथील नागरिकांना सतावत असल्यामुळे येथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात २० – २५ वर्ष जुने असणाऱ्या संरक्षक भिंतीची डागडुजी करावी आणि काही भागात नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून युथ पॉवर संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र महानगरपालिका आणि म्हाडा यांनी चक्क एकमेकांवर ढकलाढकल करत हात झटकले आहेत. त्यांच्या या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी पालिका सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांना याबाबत पत्रव्यवहार केला असून, त्यानाही पालिका प्रशासन दाद द्यायला मागत नाही आहे.

पवईमधील आयआयटी येथील टेकडीवरील भागात प्रत्येक पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. ‘याबाबत पाठपुरावा केला जात असूनही, संरक्षक भिंत बांधण्याऐवजी किंवा उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येक पावसाळ्यात पावसाच्या १०-१५ दिवस आधी येथील घरांना नोटीस दिल्या जातात.’ असा आरोप येथील स्थानिक रहिवाशां

कडून केला जात आहे.

पावसाळा सुरु होताच येथील इंदिरानगर, गौतमनगर येथील जुनाट झालेली संरक्षक भिंत आणि दरड कोसळण्याचे सत्र मागील तीन वर्षांपासून सुरु आहे. येथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी एकमेव रहदारीचा मार्ग असून, या मार्गावरच संरक्षक भिंत आहे. त्यामुळे या मार्गावरून रहिवाशी जीवमुठीत धरून ये – जा करतात.

या गंभीर प्रश्नांसंबंधी युथ पॉवर संघटना मागील दोन वर्षापासून संरक्षक भिंत बांधण्यासाठी तसेच दरड कोसळून हानी होवू नये म्हणून तेथील भागात जाळ्या लावण्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र महानगरपालिका आणि म्हाडा या दोघांनीही हे आमच्या अखत्यारीत येत नाही असे सांगत, या पाठपुराव्याला केराची टोपली दाखवली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसात इंदिरानगर येथे संरक्षक भिंत सहित दरड कोसळण्याची घटना घडली होती.

प्रशासन संरक्षक भिंत उभारण्याच्या मुद्द्यावर एक होत नसून, दोन्ही प्रशासनाच्या ढकलाढकलीच्या खेळात पवईकरांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यामुळे या जीवघेण्या संरक्षक भिंतीचा प्रश्न कोण मार्गी लावणार? एखाद्या मोठ्या हानीनंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल पवईकर करत आहेत.

स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनीसुद्धा पालिकेकडे यासाठी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे, मात्र त्यांनाही प्रशासन दाद देत नाही. ‘आम्ही पालिका एस विभाग संतोष धोंडे यांना तक्रार करत तीन वेळा जाळी लावण्याचे मागणी करणारे पत्र दिले आहे, मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पालिका प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची बहुतेक वाट बघत असावे.’ असे याबाबत माध्यमांशी बोलताना श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाला पाहता त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सामान्य जनतेचे हत्यार मानल्या जाणाऱ्या सोशल मीडियाची साथ घेतली आहे. त्यांच्या या पाऊलानंतर तरी प्रशासन जागे होवून या समस्येचे निराकरण करणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes