पवईत इंदिरानगरमध्ये दरड कोसळली; दोन घरांचे नुकसान

@प्राचा

फोटो: रमेश कांबळे

सतत दोन दिवस सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे पवईतील इंदिरानगर भागात बुधवारी पहाटे घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, या घटनेत येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथून काहीच अंतरावर असणारी सुरक्षा भिंत पडल्याची घटना घडली होती. शेवटची माहिती हाती आली तेव्हा संध्याकाळी पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना या भागात घडल्याचे समोर येत आहे.

काही काळासाठी थंडावलेल्या वरुणराजाने मुंबईत सोमवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील नेहमीच पाणी साठणाऱ्या भागांसोबतच पाणी जमा होण्याची शक्यता नसणाऱ्या भागात सुद्धा पाणी साठू लागले आहे. २६ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाची आठवण या पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांना करून दिली आहे.

या दिवसाची अजून एक आठवण करून देणारी घटना आज सकाळी पुन्हा पवईत घडली. २००५ साली दरड कोसळून काही लोकांना आपले जीव गमवावे लागले होते. तशीच दरड कोसळण्याची घटना आज पवईतील इंदिरानगर भागात घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, २ घरांचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी दरडींच्या जवळ राहणाऱ्या मुंबईकरांना पालिकेतर्फे नोटिसा पाठवून सावध करण्यात येते. पवईतील चैतन्यनगर, इंदिरानगर, गौतमनगर या डोंगराळ भागात जवळपास दिडशे कुटुंबे राहत आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याची घटना प्रत्येकवर्षी घडत असल्याने जीव मुठीत घेऊन ही सर्व कुटुंबे आपला प्रत्येक दिवस काढत असतात. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना यांनी याबाबत पालिका कार्यालय, तहसीलदार कार्यालय ते मंत्रालयचे दरवाजे झिजवले आहेत. मात्र या ठिकाणांना भेटी देण्याव्यतिरिक्त शासन दरबारातून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही.

स्थानिक रहिवाशी कैलाश कुशेर यांनी यावेळी बोलताना सांगितले, “येथे नेहमी दरड कोसळून धोका निर्माण होत असतो. सकाळी दरड कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. दरडीच्या वरील आणि खालील अशा दोन्ही भागात राहणारे लोक जीव मुठीत घेवून राहत आहेत. प्रशासन नेहमीच हात झटकून मोकळे होते.”

जुलै २०१६ मध्ये येथील चैतन्यनगर भागात पहाटे लोक साखरझोपेत असतानाचा डोंगराळ भागात असणारे झाड आणि सोबतच दरडही खाली वसलेल्या झोपडपट्टीवर कोसळली होती. ज्यात उमाशंकर गुप्ता, यशवंत शिंदे, राजभर आणि तिलकचंद उपाध्याय यांच्या घरावर दरड पडल्याने घराचे पत्रे फुटून घरात झोपेलेले लोक जखमी झाले होते. गुप्ता यांच्या घरावर मोठा दगड कोसळल्याने पत्र्याखाली दबून संपूर्ण परिवार अडकून पडला होता.

शेजाऱ्यांनी सावधानता बाळगत प्रयत्नांची पराकाष्टा करत दरडीखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढले होते. येथील कुटुंबांसाठी काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, परंतु या घटनेनंतर येथील रहिवाशांनी दरडींचा धसकाच घेतला आहे.

“पावसाळ्याच्या आधीपासून आम्ही पालिकेत या समस्येबाबत धाव घेतली होती, मात्र याबाबत कोणतीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. उलट सावधानता बाळगण्याची आणि परिसर खाली करण्याची नोटीस देण्यात आली” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

“पालिकेने जुलै महिन्याच्या ६ तारखेला नोटीस देवून येथील नागरिकांना दरड कोसळण्याची संभावना असून, त्वरित सदरहू जागा खाली करण्याची सूचना केली होती,” असे याबाबत बोलताना पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

खेटे मारून आता त्यांचे उंबरठे आणि आमच्या चपला दोन्हीही झिजले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

इनपुट: रमेश कांबळे

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!