रहेजा विहारमध्ये दिसला बिबट्या? नागरिकांकडून सावधानता

पवईतील रहेजा विहार (Raheja Vihar) परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा भिंतीजवळ बिबट्या (Leopard) दिसल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

फाईल फोटो | प्रमोद चव्हाण

पवईतील रहेजा विहार (Raheja Vihar) परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा भिंतीजवळ बिबट्या (Leopard) दिसल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी ट्वीटद्वारे दिली आहे. याबाबत वन विभागाकडून अजून पुष्टी करण्यात आली नाही. वन विभागातर्फे बिबट्याची उपस्थिती पडताळण्यासाठी कॅमेरा सापळा लावण्यात आला आहे. मात्र हे जर सत्य असेल तर लॉकडाऊनमध्ये वन्य प्राणी सिमेंटच्या जंगलात फेरफटका मारत असल्याचे नाकारता येणार नाही.

पवईतील रहेजा विहार (Raheja Vihar) कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी संध्याकाळी साडेचार – पाचच्या सुमारास कॉम्प्लेक्सजवळील भागात बिबट्याला (Leopard) पाहिल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हे कॉम्प्लेक्स मुख्य रस्त्यापासून आतील भागात वसलेले आहे, तरीही या भागात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले होते. काही वर्षापूर्वी एका मुलावर हल्ला केल्याची घटना सुद्धा कॉम्प्लेक्समध्ये घडली होती. तर एकदा कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा भिंतीला लागून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला कैद सुद्धा करण्यात आले होते.

सोमवारी (२५ मे) रहेजा विहार येथील रहिवाशी यांनी ट्वीट करत @MhahaForest @MSgnp आणि @AareyForest यांना माहिती दिली आहे की, मुंबई, पवईच्या रहेजा विहार येथील इव्हनिंग ग्लोरी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला सोसायटी गार्डनमधील एका झाडावर बिबट्या दिसला आहे. रहिवाश्याने फोटो क्लिक केला आहे, परंतु झाडांमध्ये बिबट्या ओळखणे कठीण आहे.

आणखी एका रहिवाशाने म्हटले आहे, इव्हनिंग ग्लोरीच्या पाठीमागील भागात बिबट्या विस्टा इमारतीकडे चालताना दिसला. ही भिंत पॅराडाईजला सुद्धा जोडते.

हे सुद्द्धा वाचा: पवईतील तरुणीने कोरोना वॉरिअर्ससोबत साजरा केला आपला वाढदिवस

या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी यांनी रहेजा विहार रहिवाशी संघाच्या सदस्यांच्या सोबत परिसराची पाहणी केली. मात्र तिथे बिबट्याच्या उपस्थितीचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

“कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही बिबट्या पाहिला गेल्याच्या काही घटना येथील परिसरात घडलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासोबतच खबरदारी घेण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. लोकांना चुकीची माहिती देणे किंवा त्यांच्यात भीती पसरवण्याचा उद्देश नाही” असेही येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले.

यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना वाईल्डलाईफ वार्डन आणि प्राणीमित्र सुनिष कुंजू यांनी सांगितले की, “पवईच्या रहेजा विहारमध्ये बिबट्या दिसल्याच्या गोष्टीची वनविभागाकडून कोणतीच पुष्टी करण्यात आलेली नाही. वन्य प्राण्यांना शहरी भागात पाहिले जाणे नवीन नाही. वन्य प्राण्यांच्या काही सवयी झालेल्या असतात. त्यांना कधी कुठे शिकार मिळेल, कुठे कुठल्या काळात शुकशुकाट असतो याचा अंदाज आलेला असतो. भांडूपकडून पवईकडे जाणारया पाईपलाइन भागात दोन दिवसापूर्वी एका हरणाची शिकार करताना बिबट्या आमच्या प्रतिनिधीना आढळून आला होता. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या भागात यापूर्वीही अनेकवेळा बिबट्याचा वावर पाहिला गेला आहे. त्यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्याचे जंगलाच्या बाहेर येणे नवीन नाही.”

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!