पवईत सापडले बिबट्याचे पिल्लू; आईसोबत पाठवण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न

पवईतील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीटी) परिसरात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले आहे. येथील बंद असलेल्या एका गोडाऊनमध्ये हे पिल्लू मिळून आले आहे. त्याची त्याच्या आईसोबत भेट घडवून परत पाठवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक प्रयत्न करत असून, पिल्लावर नजर ठेवून आहेत.

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीला लागून पवईतील बराच परिसर आहे. त्यामुळे पवई परिसरात अनेकदा बिबट्यांचे दर्शन नागरिकांना घडत असते. पवईतील आयआयटी आणि नीटी सारख्या परिसरात तर बिबट्यांचा नेहमीच वावर असल्याचे समोर येत असते. मानवी वस्तीत किंवा पवईमधील परिसरातून बिबट्या बचावाच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात लोक जखमी झाल्याच्या घटना सुद्धा या परिसरात घडल्या आहेत. येथील रहेजा विहार भागातून एका मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना सुद्धा काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे या परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच समोर आला आहे.

बुधवारी पवईतील नीटी परिसरात एका बंद गोडाऊनमध्ये बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव रक्षक या ठिकाणी पोहोचले. सापडलेले पिल्लू हे साधारणतः दीड ते दोन महिन्यांचे असल्याची माहिती वन विभागाकडून मिळत आहे.

“पिल्लावर नजर ठेवण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. हा परिसर रिकामा करण्यात आला असून, मादी बिबट्या स्वत:हून या परिसरातून पिल्लाला घेऊन जाण्याची आम्ही वाट पाहत आहोत,” असे याबाबत बोलताना वनक्षेत्रपाल संतोष कंक यांनी दिली.

रात्रीच्या वेळी मादी बिबट्या पिल्लाजवळ येऊन गेल्याचे कॅमेराने टिपलेल्या छायाचित्रामध्ये दिसले आहे. “बिबट्यांचा या परिसरात कायम वावर असतो. बंद गोडाऊनमध्ये सुरक्षित असल्याने मादीने तिथेच पिल्लाला जन्म दिला असण्याची किंवा तिथे आणून ठेवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मादी बिबट्या या पिल्लाजवळ येत असल्याने योग्य वेळ मिळताच मादी बिबट्या पिल्लाला येथून घेवून जाईल. सध्या वन अधिकारी त्याच्यावर नजर ठेवून आहेत.” असे याबाबत बोलताना मानद वन्यजीव रक्षक सुनिष कुंजू यांनी सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!