मरोळमध्ये रहिवाशी इमारतीत शिरला बिबट्या, तीन तासानंतर जेरबंद करण्यात यश

पवई पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या मरोळ भागात सोमवारी सकाळी भटकलेला एक बिबटया रहिवाशी इमारतीत शिरला. सकाळच्या वेळी रहिवाशी आपल्या नियमित धावपळीत व्यस्त असतानाच हा बिबट्या इमारतीच्या परिसरात शिरला. बिबट्या शिरल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. कोणालाही त्रास न देता तळमजल्यावर जिन्याखाली लपलेल्या या बिबट्याला सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वनखात्याने जेरबंद केले.

मरोळमधील विजयनगर परिसरातील वुडलँड क्रेस्ट या इमारतीत सकाळी बिबट्या शिरल्याची माहिती येथे काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांनी रहिवाशांना दिल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या कैद झाला असल्याने याची पुष्टी करत वनखात्याला याबाबत माहिती देण्यात आली. वनखात्यासह अग्निशमन दल, पोलीस आणि प्राणीमित्र संघटनेच्या जवळपास ५० लोकांनी तेथे धाव घेतली होती. मात्र बिबट्याला भूल देऊन प्रत्यक्ष पिंजऱ्यात पकडण्यासाठी जवळपास तीन तास अथक प्रयत्न करावे लागले.

मरोळमध्ये बिबट्या शिरल्याची ही दुसरी घटना आहे. दोन्ही घटनेत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मानवी वस्तीत २०१७ पासून बिबट्या शिरल्याची ही सहावी घटना आहे.

‘मरोळमध्ये आलेल्या या बिबट्याची माहिती काही क्षणातच आसपासच्या परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी उसळली होती. लोकांना कोणताही धोका उद्भवू नये आणि वनविभागाला त्यांचे काम व्यवस्थित रित्या करता यावे म्हणून नागरिकांना तेथून लांब ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ‘जनतेत याबाबत जागरूकता असणे जरुरी आहे. लोक त्या बिबट्याचा फोटो काढण्यासाठी सुरक्षा मर्यादेचा पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे त्यांना धोका संभवतो. जंगल भागात निर्धास्त फिरणारे प्राणी मानवी वस्तीत आले की घाबरून बिथरू शकतात. अशावेळी आपल्या बचावाखातर ते समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा यामुळे अडचणी येत असतात त्यामुळे नागरिकांनी थोडे जबाबदारीने वागले तर सुरक्षा यंत्रणांना मदत तर होतेच शिवाय दुर्घटना टाळता येतात.’

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!