पवई सार्वजनीन दुर्गोत्सवाचे थेट प्रक्षेपण; प्रवेश निषिद्ध

२०२० वर्ष इतर कोणत्याही वर्षापेक्षा भिन्न आहे. कोरोना महामारीला पाहता अनेक सार्वजनिक उत्सव हे सामान्य पातळीवर साजरे केले जात असतानाच नवरात्रीच्या काळात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवावर सुद्धा कोरोनाचे सावट घोंघावत आहे. यंदाचे पवई सार्वजनीन दुर्गोत्सवाचे १५ वे वर्ष असून, हा उत्सव आता लोकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण उत्सवाचे विविध माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार असून, येथे मंजुरी शिवाय लोकांना प्रवेश नसणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

दुर्गापूजेची यावर्षीची थीम ‘डाकर साज’वर आधारित आहे. मूर्ती स्थापित केले जाणारे मंदिर सजावट हे ‘घरोआ दालन / बोनेडी बारी’ सारखे मॉडेल असणार आहे. दरवर्षी हजारो लोक भोग प्रसादाचा लाभ घेतात, मात्र यावर्षी भोगाचा प्रसाद सदस्यांच्या घरी पोहचवण्यासोबतच अन्नदान स्वरुपात गरजू लोकांमध्ये वाटण्यात येणार आहे.

संपूर्ण देशभर कोरोनामुळे दुर्गापूजा साध्या पद्दतीने किंवा रद्द करण्याची वेळ आलेली असतानाच मुंबईतील सर्वांत मोठ्या दुर्गापूजापैकी एक असणारा पवईतील पवई बंगाली वेल्फेअर असोसिएशन (पीबीडब्ल्यूए) तर्फे साजरा करण्यात येणारा दुर्गापूजा उत्सव यावर्षी संपूर्ण खबरदारीत साजरा होणार आहे. नेहमीचा उत्साह कायम ठेवतानाच या आजाराला रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा होणार आहे.

पंधरा वर्षाचा झालेला हा उत्सव नेहमीसारखाच असणार आहे. मात्र येथे स्वयंसेवक, उत्सव समितीचे लोक आणि मंजुरी असणाऱ्या लोकांना वगळता इतर लोकांना येण्यास मनाई असणार आहे. पूजेवेळी होणारी पुष्पांजली, आरतीसह सर्व कार्यक्रम थेट यूट्यूब लाइव्ह, फेसबुक लाइव्ह आणि लोकल चैनलच्या माध्यमातून सर्व दिवस थेट दाखवण्यात येतील. संस्थेच्या वेबसाइटवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर याच्या लिंक प्रसारित केल्या जाणार आहेत. सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम एकतर पूर्व-रेकॉर्ड केलेले किंवा थेट संबंधित दिवसांमध्ये सोशल मीडियाद्वारे प्रसारित केले जातील.

“सामाजिक अंतर, भाविकांची संख्या, सॅनिटायझेशन, टच फ्री सॅनिटायझर मशीन, मास्कचा वापर, तापमान तपासणी, पूजेच्या अर्पणाचे आकारमान, संयोजकांची किमान उपस्थिती आणि जागेच्या जाहिरातींच्या निकषांसह मूर्तीच्या आकारमानावर सुद्धा कडक निर्बंध असतील. संस्थेतर्फे सर्व पुरोहित, मदतनीस आणि स्वयंसेवकांच्या कोविड चाचण्या देखील केल्या जाणार आहेत. फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझेशन, स्वच्छता, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आयआर थर्मामीटरने तापमान तपासणी आणि ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन पातळी तपासली जाईल.” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना आयोजकांनी सांगितले.

आम्ही नेहमीच सामाजिक एकोपा जपत हा उत्सव साजरा करत असतो. समाजातील आर्थिक आणि इतर बाबतीत दुर्बल घटकांना मदत करण्यासोबतच विविध कार्यात आमची संघटना नेहमीच कार्यरत आहे. आम्ही या काळामध्ये सकारात्मकता व आशा पसरविण्याच्या उद्देशाने आणि सर्वोच्चतेवर मानवतेच्या भावना टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने पवई सार्वजनीन दुर्गोत्सव, २०२० साजरा करू. तसेच आम्ही सर्वांचे आरोग्य व कल्याण राखण्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्यांचे व नियमांचे संपूर्ण पालन करण्याचे सुनिश्चित करतो, असेही संस्थेतर्फे सांगण्यात आले.

पीबीडब्ल्यूए आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या भिन्न सक्षम आणि सामाजिक लोकांपर्यंत पोहोचते. जवाहर जिल्ह्यात मुंबईपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या तलासरी येथील गरीब आदिवासींची गावे दत्तक घेतली आहेत. पीबीडब्ल्यूए खेडेगावात जल व्यवस्थापन प्रकल्पांसाठी काम करीत आहे आणि या साथीच्या आजारात तेथे आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुद्धा करते आहे.

संस्थेतर्फे महालयाच्या काळात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ‘ग्रीन मुंबई, क्लीन मुंबई’ उपक्रमाचा एक भाग म्हणून पवई दुर्गा पूजा मैदान आणि दीन दयाल उपाध्याय उद्यान येथे ५० अशोका आणि गोल्डन फिकस झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुर्गावोत्सवाच्या काळात रक्तदान मोहीमही घेण्यात येणार आहे.

संस्था कॅन्किड्स (कर्करोगामुळे प्रभावित मुलांना) मदत देते. कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर (सीडीसी) योजनेनुसार रेड-लाइट भागातील मुलांसाठी मासिक जेवण, ब्लाइंड पर्सन असोसिएशन आणि प्रणव कन्या (निराधार मुली-मुलाचे घर) यांच्या माध्यमातून मंत्रालयीन कर्मचार्‍यांना भोजन पुरविण्याव्यतिरिक्त कामा हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अन्नपुरवठ्यात मदत करते. मिशन स्वयंसिद्धतर्फे हे कार्य पाहिले जाते. पश्चिम बंगालमधील अम्फान चक्रीवादळाचा तीव्र धक्का बसलेल्या सुंदरबन भागाच्या पुनर्बांधणीसाठी पीबीडब्ल्यूएने हातभार लावला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!