परदेशी मद्यांमध्ये भेसळ करून विकणाऱ्याला साकीनाकामधून अटक

मुंबईतील उच्चभ्रू भागांतील बार, पब आणि मद्य दुकानात स्वस्तातील दारू भेसळ करून महागड्या परदेशी मद्यांच्या नावाने विकणाऱ्या एजेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी, १५ मार्चला साकीनाका येथून अटक केली आहे. साकीनाका येथे असणारा महागड्या मद्याच्या बाटल्यांमध्ये स्वस्तातील दारू भरणारा त्याचा अड्डाही उद्‌ध्वस्त करण्यात आला आहे. विदेशी दारूच्या ३० बाटल्या, ७४६ रिकाम्या बाटल्या, १७८ बुच, २१७ खोकी, २२९ बनावट लेबल आणि दुचाकी असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.

निरीक्षक जनार्दन खिल्लारे, सुरेश माळवे, दुय्यम निरीक्षक नीलेश गोसावी, संतोष पिसाळ, दीपक गवळी, रमेश काळोखे, मनोज होलम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

थकावट दूर करणे, आनंद साजरा करणे, गप्पांचा सोबती अशा अनेक प्रसंगी माफक मद्य शिष्टसंमत असते. अनेक वेळा भेट म्हणून देण्यात येणाऱ्या किंवा चोखंदळ मद्यप्रेमी परदेशी मद्यांना पसंती देतात. बाजार भावात परदेशी मद्यांच्या बाटलीची किंमत पाच ते सहा हजारांपेक्षा अधिक असते. अशा नामांकित ब्रॅंडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये स्वस्तात मिळणारी दारू भरली जात असून, साकीनाका परिसरात हा उद्योग सुरु असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने साकीनाका परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत किसन अमृत परमार (२९) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वालजी रूढा पटेल फरारी आहे.

‘अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने हे भेसळयुक्त मद्य “हायप्रोफाईल’ भागांतील पब, बार, वाईन शॉपमध्ये विकले जात असल्याची कबुली दिली आहे’ असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी फरारी आहे, त्याला पकडल्यानंतर बनावट दारू कोठे कोठे विकली जात होती याची माहिती मिळेल असेही अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes