मोस्ट वॉन्टेड मोलकरणीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अटक आरोपी भारती शिंदे उर्फ कविता जाधव

पवईतील लेकहोम आणि हिरानंदानी येथील व्यावसायिकांच्या घरात घरकामाची नोकरी मिळवून, २४ तासाच्या आत घर साफ करून गायब झालेल्या ३५ वर्षीय मोस्ट वॉन्टेड मोलकरणीला पवई पोलिसांनी दीड वर्षाच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी अटक केली आहे. भारती शिंदे उर्फ कविता जाधव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डिसेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ रोजी पवईतील दोन व्यावसायिकांच्या घरात तिने २३ लाखाची चोरी केली होती. दोन्ही ठिकाणी नोकरी मिळताच २४ तासाच्या आत घरातील मौल्यवान वस्तू घेवून ती पसार झाली होती.

शिंदे विरोधात वर्सोवा, सांताक्रूझ, आंबोली, खार, पंतनगर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे गुन्ह्यांची नोंद आहे.

चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी हिरानंदानी येथील वेरोना आणि लेकहोम मधील एव्हरेस्ट हाईट इमारतीतून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आपल्या खबऱ्याना दिले होते. टेक्निकल माहितीच्या आधारे आणि खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला नालासोपारा येथे ट्रॅक करून अटक केली आहे.

परिसरात चक्कर मारताना इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून कोणत्या घरात घरकामासाठी महिलेची आवश्यकता आहे का याची माहिती मिळवून ती त्या घरी नोकरी मागण्यास जात असे. ‘नोकरी मिळताच घरातील लोकांची नजर चुकवून घरात हात साफ करून ती पोलीस व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे आणायला जात आहे असे सांगून तेथून पसार होत असे, याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

२६ फेब्रुवारी २०१८ रोजी हिरानंदानी कॉम्प्लेक्समधील व्हेरोना इमारतीमध्ये राहणारे आशिष खंडेलवाल यांच्या घरात सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांसह एक लाखाची रोकड अशी जवळपास १६ लाखांची चोरी तिने केली होती. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने इंटरकॉमवर एक महिला घरकामासाठी आली असल्याचे मला माहिती दिली. तिने आपली ओळख कविता जाधव अशी करून देत त्यांची सासू राहत असलेल्या वरळी येथील सुरक्षा रक्षकाने तिला येथे घरकामासाठी महिलेची गरज असल्याने पाठवले असल्याचे सांगितले. मी तिला तिच्या कागदपत्रांची मागणी केली असता तिने उद्या आणून देते असे सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

लेकहोम येथील चोरीच्या वेळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो

खंडेलवाल जोडपे झोपेत असतानाच शिंदे उर्फ जाधवने मौल्यवान वस्तू चोरल्या. ‘दुसऱ्या दिवशी सकाळी तिने खंडेलवाल यांना कागदपत्रे घेवून येते असे सांगून घर सोडले. मात्र ती पुन्हा परतली नसल्याने खंडेलवाल यांच्या पत्नीला संशय आला. घरातील लॉकरची तपासणी केली असता घरातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली होती. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांनी सांगितले.

२६ डिसेंबर २०१७ रोजी घडलेल्या पहिल्या प्रकरणात लेकहोम येथे राहणारे व्यावसायिक आनंद जाधव (६५) यांनी शिंदेला आपल्या घरातील कामाची जबाबदारी सोपवली होती. दुसऱ्या दिवशी तिने कागदपत्रे घेवून येते असे सांगून निघून गेली ती आलीच नाही. तिथे ७ लाखांहून अधिक किंमतीच्या मौल्यवान वस्तूंवर तिने हात साफ केला होता.

अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये आणि आरोपी महिला लवकरात लवकर पकडली जावी यासाठी पवईकरांनी आरोपी महिलेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल माध्यमाच्या साहाय्याने पसरवले होते.

‘शिंदेला दोन्ही ठिकाणी कामावर ठेवण्यापूर्वी कोणत्याही सत्यापनाशिवाय किंवा कोणतीही पूर्वमाहिती न घेता कामावर ठेवले असल्यामुळे तिला गुन्हा करणे सोपे पडले होते, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

आमच्या एका खबऱ्याने तिला नालासोपाऱ्यात पाहिले असल्याची माहिती दिली होती. टेक्निकल माहिती आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या अधारावर नालासोपारा भागात आमचे पथक दोन दिवस पाळत ठेवून असताना शिंदे आपल्या सावजाच्या शोधात असताना आम्ही तिला अटक केली, असे महामुनी यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महामुनी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

शिंदेला न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिल (सोमवार) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तिच्या या गुन्ह्यातील चोरीच्या मालमत्तेचे निराकरण करणाऱ्या शमुशुमुसा शेख आणि कृष्णा यांचा पवई पोलीस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!