एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मरोळ भवानीनगर येथे एटीएम फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका चोरट्याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केली तेव्हा एटीएम फोडण्याचा त्याचा दुसरा प्रयत्न सुरु होता. गणेश दापसे (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, जागरूक स्थानिकांने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला गुन्हा घडत असताना अटक करण्यात आली.

दापसे याला तात्काळ पैसे कमवायचे असल्याने त्याने चोरीचे पाऊल उचलले असल्याचे तपासात समोर आले आहे.

गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता मरोळ, भवानीनगर येथील झेनिथ बिल्डिंग येथे एटीएम किओस्कमध्ये एक तरुण एटीएम मशीन फोडत असल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनात येताच त्याने मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर याची माहिती दिली. परिसरात गस्त घालत असणाऱ्या अंधेरी मोबाईल एक व्हॅनमध्ये असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. पडवी यांनी दापसेला ताब्यात घेतले.

“त्याच्याकडून आम्ही एक स्क्रू-ड्रायव्हर आणि पेवर ब्लॉक जप्त केले आहेत. त्याने चोरीच्या वेळी नशेचे पदार्थ खाल्ले असल्याचेही तपासात समोर आले आहे” असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

भादंवि कलम ३७९ (चोरी), ४२४ (बेकायदेशीर किंवा फसव्या पद्धतीने मालमत्ता चोरी) आणि ५११ (गुन्हा करण्याच्या प्रयत्न बद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!