मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवून देण्याचा बहाणा करून वैद्यकीय कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक

पवईत मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घर मिळवून देतो असा बहाणा करून सायन रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचे या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते, मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मुंबईतील सायन रुग्णालयात तंत्रज्ञ पदावर काम करणारे किशोर हुंबरे यांचे सुद्धा असेच स्वप्न होते. सध्या ते नालासोपारा येथे राहतात, मात्र तेथून मुंबईत कामासाठी ये-जा करण्यासाठी त्यांना मोठा त्रास होत असल्याने ते मुंबईतच एक हक्काची जागा शोधत होते. या संदर्भात मुंबईत राहत असणाऱ्या आपल्या काही जवळच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांनी आपली गरज बोलून दाखवली होती.

घराचा शोध सुरु असतानाच त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांची पवईतील म्हाडा कॉलोनीत राहणाऱ्या शरद सोनावणे याच्याशी ओळख करून दिली होती. सोनावणे याने त्यांना पवईत म्हाडाच्या इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आश्वासन देत, यासाठी २२ लाख रुपये खर्च येईल असेही सांगितले होते.

मुंबईचे हृदय मानले जाणाऱ्या पवईमध्ये एवढ्या स्वस्त दरात घर मिळत असल्याने हुंबरे यांनीही ते घर घेण्यासाठी आपली तयारी दर्शवत मे महिन्यात १ लाख रुपयाचा धनादेश टोकन म्हणून दिला होता. यानंतर वेगवेगळी कारणे सांगून सोनावणे याने त्यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले.

‘तक्रारदार यांनी घराच्या कागदपत्रांची मागणी केली असता म्हाडाच्या लेटरहेडसदृश कागदावर ताबापत्र आणि इतर कागदपत्रे त्यांना व्हॅट्सऍपवर पाठवली होती. मात्र या कागदपत्रांवर अधिकाऱ्यांची सही नसल्याने याबाबत चौकशी केली असता संपूर्ण पैसे जमा झाल्यावरच अधिकारी सही करणार असे उत्तर सोनावणेने दिले’, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘तक्रारदार यांना शंका आल्याने त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ही कागदपत्रे बोगस असल्याची माहिती त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.’

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच हुंबरे यांनी पवई पोलिस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!