ऍपवरून रिचार्ज करायला गेला आणि ७९ हजार घालवून बसला

मोबाईल ऍपवरून आपल्या पत्नीला केलेला रिचार्ज का झाला नाही याची कस्टमर केअरकडे चौकशी करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला बनावट कस्टमर एक्झिक्युटिव्हने ७८,९९५ हजार रुपयाला गंडवल्याची घटना नुकतीच मरोळ भागात उघडकीस आली आहे. यासंदर्भात अज्ञाताविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

मूळचा झारखंडच्या असणारा अनिल तालेश्वर यादव आपल्या कुटुंबासह पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरोळ भागात राहतो. येथील जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये तो कार चालक म्हणून काम करतो. आई – वडील गावी असल्याने त्यांना महिन्याला लागणार खर्च, मोबाईल रिचार्ज, बिले भरणे यासाठी “गुगल पे” या ऍप्लिकेशनचा तो वापर करतो. हे ऍप्लिकेशन त्याने त्याच्या युनियन बँकेच्या खात्याशी जोडलेले आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या कामाच्या ठिकाणी हॉटेलवर असताना त्याच्या पत्नीचा मोबाईला रिचार्ज करायचा असल्याने त्याने या ऍपचा वापर करून ११९ रुपयांचा रिचार्ज केला होता. युनियन बँकेच्या खात्यातून ती रक्कम वजा झाल्याचा संदेश सुद्धा त्याला मिळाला होता. मात्र रिचार्ज झाला नसल्याचे त्याच्या पत्नीने त्याला सांगितले.

नक्की काय झाले आहे हे तपासून पाहण्यासाठी ऍपमध्ये दिलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून त्याने खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नंबर व्यस्त असल्याने त्याचा संपर्क झाला नाही.

काही वेळातच ९१६३४६८१७० या क्रमांकावरून मला फोन आला. त्याने तो गुगल पेच्या कस्टमर केअर केंद्रातून बोलत असल्याची सांगत आपली काही तक्रार आहे का अशी माझ्याकडे विचारणा केली. मी माझी तक्रार सांगताच त्याने मला ‘आप मोबाईलपे “एनी डेस्क” एप्लिकेशन डाउनलोड किजीये और आये हुवे लिंक पार व्हेरिफाय किजीये’ असे मला सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात यादव याने म्हटले आहे.

त्याच्या सूचनांचे पालन करत असतानाच त्याने एक १२ आकडी क्रमांक मोबाईलवर आला असेल त्याला देण्याची विनंती मला केली. मी तसे करताच माझ्या खात्यातून दहा हजार रुपये वजा झाल्याचा मॅसेज मला मिळाला. याबाबत विचारणा केली असता त्याने मला पाहणी सुरु असून, लवकरच सर्व पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा होतील असे सांगत १४९९९ रुपयांचे ३ ट्रान्जेक्शण मला करावयास सांगितले. त्यानंतरही बोलण्यात गुंतवून विविध वेळात २३९९८ रुपये त्यांनी खात्यातून काढले. असेही यादव याने पोलीस जवाबात म्हटले आहे.

बराच काळ उलटूनही खात्यात पैसे परत जमा होत नसल्याने त्याने आपल्या बँकेच्या खात्यात जाऊन याबाबत चौकशी केली असता, बँक कर्मचाऱ्याने खात्यात पुन्हा पैसे जमा झाले नसून, कोणीतरी तुमची फसवणूक केली असेल असे सांगत पोलीस तक्रार करण्यास सांगितले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्याने पवई पोलीस धाव घेतली. ‘वेगवेगळ्या ट्रान्सफर्सच्या माध्यमातून ७८,९९५ रुपये खात्यातून काढण्यात आले आहेत. आम्ही भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलाम ६६ (क) (ड) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.’ असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक तुषार काळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!