चैतन्यनगर घरफोड्यांच्या मास्टरमाइंडला अटक

पवई, चैतन्यनगर भागात घडणाऱ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या मास्टरमाइंडला पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनिल उर्फ बंटी सुरेश वर्मा (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप हस्तगत केले आहेत. अजूनही काही चोऱ्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. जवळपास दर दोन तीन दिवसांनी घरफोडीच्या, चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घरात मिळेल त्या वस्तू हे चोरटे पळवत होते.

अंधाराचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या या चोरट्यांना रोखण्याचे एक मोठे आव्हान पवई पोलिसांसमोर होते. यासाठी दोन्ही गुन्हे प्रकटीकरण पथके आणि अधिकारी दिवसरात्र मेहनत घेत होते.

“परिसरात उपलब्ध झालेल्या सीसीटीव्हीच्या आधारावर आम्हाला गुन्हेगाराची ओळख पटली होती. मात्र दिवसा तो लपून बसत असे आणि रात्रीच्या वेळेस आपला डाव साधून तो पुन्हा गायब होत असे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याचा एक डाव आखण्यात आला होता.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“आमचा शोध सुरु असतानाच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपीला अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.

“आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी ९ गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. आरोपीकडून आम्ही १५ ग्राम सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप (मॅकबुक) हस्तगत केले आहे,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महामुनी यांनी सांगितले.

आरोपी हा स्थानिक परिसरातीलच आहे. चैतन्यनगर भागातील प्रत्येक गल्लीबोळ त्याला माहिती आहे. चोरी करण्यापूर्वी तो परिसरातील घरांची पाहणी करून ठेवत असे, रात्री संधी मिळताच घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी करून तो पसार होत असे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, घरफोडीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या अनिलची एप्रिल महिन्यातच लॉकअपमधून सुटका झाली होती. त्यानंतर काही दिवस शांत बसल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीला सुरुवात केली होती.

पोलिसांनी अटक आरोपीकडून जुन्या सायकली सुद्धा हस्तगत केल्या असून, अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!