पवईत एमबीए विद्यार्थ्याचे अपहरण; अर्धातास गाडीत मारहाण करून निर्जनस्थळी सुटका

जोहान दिवेचा

गाडीच्या अपघाताचा राग मनात धरून एमबीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात पवईत घडली. सोशल मिडियावर मुलीची खोटी प्रोफाईल बनवून, त्याद्वारे फूस लावून विद्यार्थ्याला बोलावून अपहरण करण्यात आले होते. चालत्या गाडीत अर्धा तास चोप देवून सुटका केल्यानंतर प्रकरण समोर आले. पवई पोलिसांनी या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक केली आहे.

सोमवारी, २६ फेब्रुवारीला विक्रोळी येथे राहणारा जोहान दिवेचा दुपारी २ वाजता आपल्या वेगोनॉर कारने घाटकोपर येथील क्लासवरून घरी परतत असताना, रस्त्यात एक मोटारसायकल सोबत अपघात झाला. मोटारसायकल असणाऱ्या तरुणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली, मात्र त्याने कसाबसा स्वतःचा बचाव करत तिथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी जोहानला, हर्षा जोशी नामक तरुणीची सोशल साईटवर फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली. दोघांच्यात गप्पा रंगू लागल्या असतानाच हर्षाने भेटण्याची इच्छा व्यक्त केली; ज्यानुसार दोघांचे पवईत भेटण्याचे नक्की झाले. असे पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

“२८ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता हर्षाला भेटण्यासाठी मी पवईतील हिरानंदानी रुग्णालय येथे आलो. गप्पांच्या दरम्यान हर्षाने तिथे आल्यावर चॉकलेट घे, म्हणजे मी तुझ्या हातात चॉकलेट बघून तुला पटकन ओळखेन असे सांगितले होते, म्हणून मी मेडिकलच्या दिशेने जात असतानाच पाच तरुणांनी जबरदस्तीने काळ्या काचा असणाऱ्या होंडा सिटी कारमध्ये मला ढकलून अपहरण केले” असे जोहानने पवई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

गुन्ह्यात वापरलेली कार

“जवळपास अर्धा तास गाडी आसपासच्या परिसरातच फिरवत ते मला सतत मारत होते. मला श्वास घेणे अशक्य झाल्यानंतर, मी त्यांना मला अस्थमा असल्याचे सांगितले. एका मेडिकलच्या दुकानाजवळ गाडी थांबून ते अस्थमाचा पंप घेवून आले. मात्र माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनाशी तो जुळला नाही तर त्याचा काही एक उपयोग नाही, असे मी त्यांना सांगितल्यानंतर माझ्या जवळचे २२,००० रुपये रोकड आणि दोन मोबाईल फोन काढून घेवून, एका काम बंद पडलेल्या इमारतीजवळ निर्जनस्थळी मला कारमधून उतरवून मोटरसायकलने माझ्या गाडीजवळ सोडण्यात आले” असेही जोहानने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

जोहानने कसेबसे घर गाठून परिवाराला घडला सर्व प्रकार सांगितल्यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल करून, पवई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. जोहानची प्रकृती आता ठीक असून, त्याला किमान आठवडाभर आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

“आम्ही परिसरातील सिसिटीव्हीचे फुटेज तपासले असता, तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाची एक कार रुग्णालय, ९० फुटी रोड आणि परिसरात फिरताना आम्हाला आढळून आली. कारच्या समोरील भागात एका पक्षाचा सिम्बॉल दिसत होता, ज्याच्या आधारावर माहिती मिळवत आम्ही मुख्य आरोपी अनिकेत कदम (२१) मुकेश वर्मा (२०) देवेंद्र प्रधान (१९), संतोष सुरवाडे (३०) आणि सागर कदम (१९) यांना अटक केली आहे. अनिकेतकडून गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा आम्ही हस्तगत केली आहे” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे यांनी सांगितले.

“आरोपी आणि तक्रारदार हे एकाच परिसरात राहतात. त्यांच्यात वैयक्तिक वाद होते का? याचा सुद्धा आम्ही तपास करत आहोत,” असे याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

तक्रारदार यांच्या दोन मोबाईल पैकी एक मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, दुसरा मोबाईलचा शोध घेत आहेत. “अटक आरोपीं हे त्यांनी खोटी प्रोफाईल बनवली नसल्याचे पोलीस चौकशीत सांगत आहेत. ते तक्रारदार याच्यापर्यंत कसे पोहचले? मुलीला भेटायला गेला तेव्हा आरोपी सुद्धा तिथेच कसे उपस्थित होते? असे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही सायबर सेलची मदत घेत आहोत. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!