मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरून पवई मार्गे जाणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१८ पासून सुरु झाले आहे. मात्र मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर एमएमआरडीएने नागरिकांचा सल्ला मागितला होता. जनमत विचारात न-घेता प्रकल्पाचे काम सुरु करून सहा महिने उलटल्यावर प्राधिकरण लोकांकडून सल्ले मागत असल्यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नाराज झाले होते. बांधकाम सुरू केल्यानंतर लोकांचा सल्ला विचारणे केवळ कागदपत्रांच्या बाबतीतील औपचारिकता असल्याचा आरोपही त्यांच्याकडून झाला. संभाव्य समस्या पाहता मेट्रो – ६ प्रकल्प हा भूगर्भीय (अंडरग्राउंड) करावा अशी मागणी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

कामावेळी पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम विचारत घेतला नसल्याने पुढील काळात मोठ्या समस्या उभ्या राहणार असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगितले जात असतानाच मेट्रो ६ प्रकल्पात ३४० झाडांना हटवावे लागणार असल्याचे समोर आले होते.

मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली असून, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे.

“प्रकल्पाच्या नियोजनानुसार योजना जर कार्यान्वित केली गेली तर आधीच या परिसरात होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासात अजून भर पडत मोठे नुकसान पवईकरांना आणि या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना सहन करावे लागणार आहे. पवई तलावाची शांतता भंग होईल. पवई तलाव, महाकाली गुंफा किंवा सीआरझेडमध्ये येणाऱ्या क्षेत्रांवर मोठा परिणाम जाणवेल”, असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

तोडल्या जाणाऱ्या वृक्षांपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण आणि पुनर्रोपण करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. अशोका, कदंब, मोहागणी, करंजा, सीता अशा विविध देशी झाडांचे रोपण केले जात आहे. मात्र “पुनर्रोपण करण्यात आलेल्या वृक्षांच्या जिवंत राहण्याची किंवा दीर्घकाळ टिकण्याची उदाहरणे कमीच आहेत”, असेही यासंदर्भात बोलताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
पवई तलावाच्या किनाऱ्यावर झाडांची मियावाकी पद्दतीने लागवड

एकाबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने प्रत्येक व्यक्तीपाठी ५ झाडे अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच पवई तलाव परिसरात मियावाकी पद्दतीने वृक्षलागवड केली जाणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या प्रकल्पानुसार हा उपक्रम राबवला जात असून लवकरच याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच पवईकर आणि पालिका अधिकारी यांच्या संयुक्त माध्यमातून पवई तलाव भागाचा दौरा करत येथील मुख्य विसर्जन घाट, कावास्जी बंगला,रामबाग, निसर्ग उद्यान या भागात मियावाकी पद्दतीने वृक्षलागवड करण्यासाठी जागा नियोजित करण्यात आल्या आहेत.

१९ सप्टेंबरला पवईकर आणि स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने घाटकोपर येथील महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक विभागाला भेट दिली होती. यावेळी तेथील अधिकाऱ्यांसोबत पवई तलावाच्या काठावरील मियावाकी वृक्षारोपण प्रस्तावाच्या प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीत प्रकल्प अडकला होता, मात्र आता हा प्रकल्प लवकरच स्थायी समितीकडे मांडला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!