पवईतील सुरक्षा भिंतीची आमदार, नगरसेवक यांच्याकडून पाहणी

मुंबईतील सततच्या पावसामुळे पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर लोकवस्तीला जाणाऱ्या मार्गावर असणारी सुरक्षा भिंतीचा भाग गुरुवार, १६ जुलैला पडल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिक आमदार आणि नामनिर्देशित नगरसेवक यांनी परिस्थितीची पाहणी करत यंत्रणांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुंबईत आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, इमारतीचे भाग पडणे अशा घटना घडल्या आहेत. पवईत सुद्धा लियो चर्च जवळ रस्त्याच्या किनारी असणाऱ्या सुरक्षाभिंतीचा भाग पडल्याची घटना १६ जुलै रोजी घडली.

पावसाळा सुरु होताच पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर या भागातील लोक जीव मुठीत घेवून प्रवास करत असतात. येथील जुनाट आणि कमकुवत झालेल्या संरक्षक भिंती रहदारीच्या मार्गावर कोसळण्याचे सत्र मागील काही वर्षांपासून सुरुच आहे. वारंवार घडत असणाऱ्या घटना पाहता संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात यावी तसेच काही भागात नवीन संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. मात्र याची जबाबदारी चक्क एकमेकांवर ढकलत महानगरपालिका आणि म्हाडा यांनी हात झटकले आहेत.

म्हाडा, पालिकेने झटकले हात

भिंतीची उंची ही ९ मीटर पेक्षा जास्त असल्याने ती आमच्या कार्यालयाच्या कक्षेत येत नाही, असे म्हाडा प्रशासनाचे म्हणणे आहे. तर संरक्षक भिंतीचे काम करणे पालिकेच्या अखत्यारीत येत नाही, याबाबत म्हाडाला त्वरित भिंत बांधावी असे पत्र दिले असल्याचे उत्तर पालिकेकडून मिळत आहे. दोन्ही प्रशासकीय कार्यालये एकमेकांकडे जबाबदारी ढकलत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत

या जीवघेण्या संरक्षक भिंतीचा प्रश्न नक्की कोण मार्गी लावणार? हा प्रश्न नागरिकांच्या मनात घोळत असतानाच स्थानिक आमदार सुनील राऊत आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी घटनेची पाहणी करून आढावा घेतला आहे.

“मी घटनेचा आढावा घेतला आहे आणि पालिका अधिकाऱ्यांना त्वरित पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत,” असे याबाबत बोलताना आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.

“घटना घडली तेव्हा मोठा पाऊस सुरु होता. मी घटनेचा आढावा घेतला असून, पालिका एस विभागाचे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती घेवून, कारण शोधत कारवाई करण्याची सूचना केलेली आहे.” असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “पालिका कनिष्ठ अभियंता ससाणे यांनी सुद्धा घटनेची आणि परिस्थितीची पाहणी केली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!