ओळखपत्र पाहण्याच्या बहाण्याने चोरी

Image credit – Dreamstime.com

दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी एका व्यक्तीला रस्त्यात अडवून ओळखपत्र दाखवण्यास सांगत त्याच्याजवळील २० हजार रुपये चोरून नेल्याची घटना पवईत रविवारी घडली. मुन्ना नुरमोहम्मद खान (४५) असे पीडित व्यक्तीचे नाव असून, त्याने मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी जमवलेले पैसे चोरट्यांनी लांबवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान अंधेरी पूर्वेतील एका ऑटोमोटिव्ह युनिटमध्ये काम करतो. दररोज किमान ९ नंतरच तो शक्यतो कामावरून घरी परतत असतो. रविवारी रात्री कामावरून आपल्या घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्याला रस्त्यात रोखत त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली.

सध्या मुंबईला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. विचारपूस करणारे कोणीतरी अधिकारी असावेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव चौकशी करत असल्याचे समजून त्याने खिशातून पाकीट काढले. मोटारसायकलवर पुढे बसलेली व्यक्ती त्याची चौकशी करत असतानाच पाठीमागील व्यक्तीने हातातील पाकीट माझ्याकडून घेतले.

त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतानाच पाठीमागील व्यक्तीने माझे पाकीट मला परत केले आणि ते तिथून निघून गेले. मी पाकीट उघडून पाहिले असता त्यात ठेवलेले २० हजार रुपये गायब होते. जे मी माझ्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी जमा केले होते, असे खान याने पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

घटना एवढ्या जलद झाली की, खान यांना चोरट्यांच्या दुचाकीचा नंबर देखील घेता आला नाही. दोन्ही इसम हे २५ ते ३२ वर्ष वयोगटातील होते. दोघांनीही पोलीस साध्या वेशात फिरताना जसा पेहराव करतात तसाच पेहराव केला होता, असे खान याने त्या व्यक्तींचे वर्णन पोलिसांना दिले आहे.

भादवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर लुटारूंचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!