ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; जम्मू काश्मीरहून मुंबईत आणलेला १४ कोटींचा चरस जप्त, ४ जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई करत ड्रग्स तस्कर महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोइन जप्त केले असतानाच आता जम्मू काश्मीरशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत पवई आणि अंधेरी स्थित २ जोडप्यांकडून २४ किलो चरस जप्त केले आहे.

पकडलेल्या २४ किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल १४ कोटी ४४ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बंडू दगडू उदनशिवे (५२), त्याची पत्नी क्लेरा उदनशिवे (५२) दोघेही राहणार पवई, त्यांची मुलगी सिंथिया (२३) आणि जसर जहांगीर शेख (२४) दोघेही अंधेरी उपनगरातील रहिवासी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कौटुंबिक दौऱ्यावर जात असल्याचे भासवून काश्मीरला भेट देणारे हे लोक उच्च दर्जाच्या चरसची वाहतूक आणि विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर दहिसर चेकनाका येथे सापळा रचून कार तपासली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

मुंबई गुन्हे शाखेच्या यूनिट ७ आणि यूनिट ६ ने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर, पोलिसांना चरस तस्करांना पकडण्यास यश आले. अटक सर्व आरोपी जम्मू काश्मिरमधून ड्रग्स आणून मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील ड्रग्स तस्करी करत होते.

तस्कर ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणत होते. यातील मुख्य आरोपी आणि त्याची पत्नी हे पवईचे रहिवासी आहेत. तर मुलगी आणि इतर एक हे अंधेरी येथे राहतात.

“मुख्य आरोपी उदनशिवे हा काश्मीरमधून अंमली पदार्थ आणून त्यानंतर तो आणि इतर आरोपी मुंबईतील त्यांच्या ग्राहकांना विकायचे. पोलिस तपास आणि पुढील चौकशी टाळण्यासाठी ते महिला आणि मुलांना सोबत घेऊन कौटुंबिक दौऱ्यावर जात असल्याचे भासवत असे,” अशी माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, काश्मीरला जाताना ते मोबाईल बंद करायचे. कारच्या दाराच्या पोकळीत आणि वाहनाच्या मागील पॅनलमध्ये ड्रग्ज लपवून ते परत येत. २०१० मध्ये मुख्य आरोपी उदनशिवे याला मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने ३९ किलो चरससह पकडले होते. आरोपी अंमली पदार्थ कोणाला विकायचे याची पोलिस पडताळणी करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!