पवईच्या रस्त्यांवर मुंबई दर्शन आणि शिवकालीन इतिहास

@ सुषमा चव्हाण

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. १५ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढून आता ३१ मे पर्यंत झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा नाहीये. मे महिना म्हणजे शालेय सुट्ट्या आणि नागरिकांच्या पर्यटनाचे दिवस मात्र, या लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने हे शक्य नाहीये. हेच पाहता पालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत चित्र रुपात प्रत्यक्ष मुंबईच पवईच्या रस्त्यांवर उभी केली आहे.

मुंबईची मुख्य पर्यटनस्थळे आणि आकर्षणाची ठिकाणे, शिवकालीन इतिहास पेंटिंग स्वरुपात पवईतील मुख्य मार्ग असणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) अवतरला आहे. तसेच पवईच्या अंतर्गत भागात पदपथाला लागून असणाऱ्या संरक्षक भिंतीवर आकर्षक चिञे काढून त्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.

गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा केव्हस, राणीची बाग, म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन, नेहरू सायन्स सेंटर, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, तारापूर मस्त्यालय, समुद्र किनारा, आयआयटी मुंबई अशी मुंबईची अनेक पर्यटनस्थळे आणि आकर्षणाची ठिकाणे यांच्यासह शिवकालीन इतिहासातील क्षण, समुद्री दुर्ग सारख्या चित्रातून मुंबईसह महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन येथे घडते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई मोहिमे अंतर्गत पालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत तयार होत असलेल्या या चित्रनगरीमुळे पवईतील रस्ते चित्रमय झाले आहेत. विविध पक्ष, संघटनांच्या भिंतीवरील जाहिराती आणि पोस्टरबाजीमुळे विद्रुप झालेल्या पवईतील भिंतींना आता वेगळाच साज मिळत आहे. पालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत येथील भिंतींवर ‘पाणी वाचवा’; ‘झाडे लावा, झाडे जगवा’; ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका’; ‘स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर’ असे संदेश या चित्रांच्या माध्यमातून नागरिकांना देवून त्यांच्यात जनजागृती केली जात आहे.

“आम्ही आपला परिसर स्वच्छतेच्या दिशेने घेवून जाण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहोत. कोरोनामुळे परिसराच्या स्वच्छतेसोबतच स्वतःच्या स्वच्छतेचे महत्व सुद्धा नागरिकांना लक्षात आले आहे. पालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियान मोहिमे अंतर्गत परीसरात जिथे-जिथे कचरा टाकला जातो. रस्त्याच्या कडेला व पोस्टरबाजी मुळे विद्रुप झालेल्या भिंती आणि पवईतील विविध भागातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढून पवईकरांना जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना पालिकेतर्फे सांगण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ साली राज्याच्या राजधानीच्या श्रेणीत मुंबईला पहिले स्थान मिळाले होते. तिथेच केंद्र सरकारच्या २०१९ सालच्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला घसरंडी मिळत ४९व्या क्रमांकावर फेकले होते. महाराष्ट्रातून नवीमुंबई शहराने फक्त पहिल्या दहात आपले स्थान निर्माण केले होते.

“पवईच्या भिंती आकर्षक होत आपला परिसर सुंदर बनत असल्यामुळे आमच्या मनाला उभारी मिळत आहे. कोरोनाकाळात घरात अडकून पडल्याने अनेकांची मानसिक अवस्था बिघडत चालली आहे. अशात आपला हिरवागार आणि रंगीबेरंगी सजावटीने सजलेला परिसर बघून नागरिकांना प्रसन्न वाटते”, असे याबाबत बोलताना पवईकरांनी सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!