विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई; परिमंडळ १० मध्ये १७५८ गाड्या जप्त

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आता पुढे सरसावली असून, विनाकारण घराबाहेर पडून नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मुंबई पोलिसांतर्फे केल्या गेलेल्या कारवाईत परिमंडळ १० च्या हद्दीत येणाऱ्या पवई, साकीनाका, एमआयडीसी, अंधेरी आणि मेघवाडी पोलीस ठाणे परिसरात दोन दिवसात १७५८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात या परिमंडळात सर्वाधिक गाड्या जप्त केल्या आहेत. मुंबई परिसरात केलेल्या कारवाईचे आकडे मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहेत.

रविवारपासून मुंबई पोलिसांनी रस्त्यावर नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर सुरु केलेल्या कारवाईत रविवारी परिमंडळ १०मध्ये १२९७ वाहने तर सोमवारी ४६१ वाहनांना जप्त करण्यात आले आहे.


राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही शिथीलता देण्यात आल्या आहेत. याचाच फायदा घेत काही मुंबईकर विनाकारण विना परवानगी मुंबईत फिरत आहेत. अशा लोकांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. मरिन ड्राईव्हपासून दहिसर आणि मुलुंडपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिमंडळ १०मध्ये सर्वाधिक गाड्या जप्त केल्या आहेत.


लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर अनेक मुंबईकर कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत होते. मुंबई पोलिसांच्या या कारवाईनंतर त्यांना चांगलाच वचक बसेल असे बोलले जात आहे.

“नागरिकांना ज्या सूचना केलेल्या आहेत त्यांचे त्यांनी पालन करायला हवे. आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करायची आहे. नागरिक जर विनाकारण आपल्या मोटारसायकल, कारने फिरत असाल किंवा विनामास्क फिरताना आढळून आल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आपले वाहन जप्त केले जाईल, आपल्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो,” असे याबाबत बोलताना परिमंडळ १० प्रभारी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले.

एकट्या पवईत रविवारी ३५० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली होती. तसेच सोमवार आणि मंगळवारी सुद्धा पोलिसांची कारवाई सुरूच होती असे पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नियमावली

  • घराबाहेर केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पडावे.
  • घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
  • घरापासून फक्त २ कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजार, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल.
  • व्यायामाची परवानगी घरापासून २ कि.मीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
  • कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत २ कि.मी.च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
  • सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने बंद करण्यात येतील.
  • रात्री ०९.०० ते पहाटे ०५.०० वाजण्याच्या दरम्यानच्या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.
  • वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!