पवईत रेस्टोबारवर छापा, मालकासह ६ कर्मचाऱ्यांना अटक

पवईतील एका रेस्टोबारवर मुंबई पोलिसांनी छापा मारत रेस्टोबारच्या मालकासह सहा कर्मचाऱ्याना रविवारी अटक करण्यात आली. आस्थापनेला पब चालविण्याची परवानगी नव्हती आणि निर्धारित मुदतीच्या पलीकडे पब चालू ठेवण्यात आला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवई तलाव मेट्रो स्थानकाचे काम सुरु असणाऱ्या भागाला लागूनच असणाऱ्या एका इमारतीत रात्रीच्या वेळी पब चालत असून, तिथे पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत परवाने नसल्याची माहिती मुंबई पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी परिमंडळ ११ पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी पथकासह रविवारी रात्री ३.१५ वाजता या पबवर छापा मारला.

“आस्थापनेकडे फक्त डायनिंगची परवानगी आहे. आम्ही छापा मारला तेव्हा जवळपास १५० तरुण तरुणी तिथे नाचत होते. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार आम्ही गुन्हा नोंदवला असून, अस्थापनेचा मालक व सहा कर्मचारी यांना ताब्यात घेतले आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“पाठीमागील अनेक महिन्यांपासून या इमारतीच्या छतावर बेधडकपणे हा पब चालवला जात होता. रात्रीच्या वेळी मोठ मोठ्याने म्युजिक सुद्धा लावले जात होते. याबाबत स्थानिकांनी तक्रारी करून सुद्धा एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती,” असेही याबाबत बोलताना काही स्थानिकांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!