पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांत लपवली कॅरमची सोंगटी

पोल‌िस भरतीमध्ये डमी उमेदवार उभे केलेल्या तरुणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या सहाय्याने काळी सोंगटी चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मरोळ येथे पोलिस मैदानावर भरती दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत उमेदवाराला अटक केली आहे.

मुंबईत होणाऱ्या पोलिस भरतीत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असतात, त्यामुळे मुंबईत होणाऱ्या पोलीस भरतीत प्रत्येकवेळी राज्यभरातून अनेक उमेदवार आपले नशीब आजमवण्यासाठी येतात. यावर्षी एप्रिल महिण्याच्या सुरवातीपासून मुंबईतील मरोळ आणि नायगाव येथे पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज हजारो उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाते.

भरती प्रक्रियेच्या काळात नाशिकमध्ये उंची वाढवण्यासाठी उमेदवाराने केसांचा विग लावल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, असा कोणताही प्रकार मुंबईत घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी खास दक्षता घेतली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असून, उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकही तैनात करण्यात आले आहे.

अनिकेत रावजी हा पोलीस दलात भरती होण्यासाठी अमरावतीवरून मुंबईत आला होता. ज्यासाठी मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी गेल्या वर्षभरापासून तो सज्ज होता. मात्र, पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या उंचीपेक्षा एका इंच उंची कमी पडत असल्याने त्यास काय करावे समजत नव्हते. एक इंच उंची वाढावी म्हणून त्याने अनेक उपाय केले, मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत होते.

पाठीमागील आठवड्यात मरोळ येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची छाती आणि उंचीची तपासणी होणार होती. यातून पार पडता यावे म्हणून एक इंच उंची कमी पडणाऱ्या अनिकेतने आपली उंची वाढवण्यासाठी केसांमध्ये च्युइंगमच्या मदतीने कॅरमची काळी सोंगडी चिटकवली होती.

“अनिकेत मैदानात आला तेव्हा तो भेदरलेला दिसत होता. उंची मोजण्यासाठी त्याच्या डोक्यावर फुटपट्टी टेकवली तेव्हा पोलिस शिपायाला त्याच्या डोक्यावर काहितरी टणक वस्तू असल्याचे जाणवले. संशय आल्याने अनिकेतची झडती घेतली असता सगळा प्रकार उघडकीस आला.” असे पवई पोलीस ठाण्याच्या तापसी अधिकाऱ्याने सांगितले.

अनिकेतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पवई पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!