स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि अन्य मान्यवर

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

दीक्षांत समारंभात २६२१ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली, तर ३८० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात आले. आयआयटी मुंबईच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाधारित प्रदर्शनाला पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या प्रदर्शनातील उपकरणे, शोध पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurating the new building of the Department of Energy Science & Engineering and Centre for Environmental Science and Engineering, at IIT Bombay, in Mumbai on August 11, 2018.
The Governor of Maharashtra, Shri C. Vidyasagar Rao, the Union Minister for Human Resource Development, Shri Prakash Javadekar, the Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis and other dignitaries are also seen.

कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मोदी यांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पाठीमागील चार वर्षांमध्ये आपल्या सर्वांसाठी शिकण्याचा एक अद्भूत अनुभव होता, महाविद्यालयीन उत्सव, वसतीगृहे, आंतर विद्याशाखा, संघटना आदी गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. दर्जेदार, सर्वोत्कृष्ठ शिक्षण आपल्याला या शिक्षणप्रणालीद्वारे प्राप्त झाले आहे. येथे विद्यार्थी भारताच्या विविधतेचे प्रतिनिधीत्व करतात, विविध भाषा, अनेकविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी ज्ञान आणि शिकण्यासाठी येथे एकत्र येतात. आयआयटीला जगात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तरी, आज त्याची व्याख्या बदलली आहे. हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिले नसून, आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दीक्षांत समारंभात २६२१ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली, तर ३८० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाच्यावतीने एक हजार कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आले आहे. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून संशोधन आणि नाविण्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

गेल्या सहा दशकांत आयआयटीने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, ज्यांची आयआयटी ही प्रेरणा आहे, यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

नावीन्यता आणि उद्योगांच्या माध्यमातून भारताची विकसित अर्थव्यवस्थेची पायाभरणी होत आहे. कोणतीही संस्था नावीन्यतेशिवाय स्थिर होऊ शकत नाही. याच नावीन्यतेच्या शोधातून भारत हे स्टार्टअपचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. नावीन्यता आणि उद्योगासाठी भारत हे जगाचे आकर्षण केंद्र व्हावे यादृष्टिने आपण प्रयत्न करीत असून, हे केवळ शासनाच्या प्रयत्नांतून होणार नाही, तर त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची आवश्यकता आहे. स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे. इथून पुढेही अशा नावीन्यपूर्ण संकल्पना आयआयटीसारख्या कॅम्पसमधून आणि आपल्यासारख्या युवकांच्या मनातून निर्माण होतील, असेही पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले.

आयआयटी मुंबईच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाधारित प्रदर्शनाला पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली

इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप परिश्रम घेतले आहेत, आज प्रदान झालेली पदवी ही आपल्या समर्पण आणि बांधिलकीचे प्रतीक आहे. हा केवळ एक टप्पा असला तरी खरे आव्हान अजून आपल्याला पेलायचे आहे. तुम्ही जे काही मिळवले आहे आणि जे मिळवायचे आहे त्यामागे तुमच्या परिवाराच्या आणि सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशा-अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आयआयटी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष दिलीप शंघवी यांनी दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक केले. तर संचालक प्रा. देवांग खक्कर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. सिम्फनी एआय ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रोमेश वाधवानी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरु तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते २९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!