निर्वाणा पार्क आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान

पवईतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या निर्वाणा पार्कचे आज (बुधवार, १६ जानेवारी) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, महानगरपालिका ‘एस’ उद्यान विभागाच्या म्हात्रे मॅडम आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम पार पडला.

पवई म्हटले कि, पर्यटन प्रेमींच्या आकर्षणाचे ठिकाण, येथील पवई तलाव आणि निर्वाणा पार्क हे मुंबईकरांसाठी विशेष आकर्षणे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला लागून असणाऱ्या निर्वाणा पार्कची निर्मिती हिरानंदानी समूहाच्यावतीने हिरानंदानी कॉम्प्लेक्स वसण्याच्या सुरुवातीच्या काळात करण्यात आली आहे. हिरव्या गर्द झाडीत वसलेले हे उद्यान नावाप्रमाणेच निर्वाणा देणारे आहे. लहान मुलांना खेळायला सुविधा, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी आणि गप्पा गोष्टीसाठी हक्काच्या जागा, छोटे मोठे पॉन्ड आणि त्यात असणारे रंगेबेरंगी मासे हे यातील खास आकर्षण.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईचे तर हे हक्काचे ठिकाण. सध्या सेल्फी आणि फोटोच्या जगात येथे केलेल्या विशेष रचनांच्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी पहायला मिळते. अनेक वर्ष हिरानंदानी समूहातर्फे या उद्यानाची डागडुजी पाहिली जात होती, मात्र काही महिन्यांपूर्वीच पालिकेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

‘येथील अनेक उद्यानांना इंग्रजी नावे देण्यात आली आहेत. पवई सर्व स्तरातील लोकांची वस्ती आहे. म्हणूनच आमचे आदर्श आणि श्रद्धास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची आठवण कायम राहण्यासाठी आम्ही येथील उद्यानांना त्यांची नावे द्यावीत अशी मागणी पालिकेकडे केली होती. ज्याच्या मंजुरीनंतर आज निर्वाणा पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे’ असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.
वेळेत बदल

नावात झालेल्या बदला सोबतच उद्यानाच्या वेळेतही बदल करण्यात आलेले आहेत. सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे उद्यान सुरु असणार आहे.
प्रकाश व्यवस्थेची बोंबाबोंब

उद्यानांची नावे बदलली, पण उद्यानात स्वच्छतेची हयगय तर आहेच पण विशेष म्हणजे उद्यानात प्रकाश व्यवस्थेची बोंबाबोंब आहे. ‘संध्याकाळी ७ नंतर उद्यानात आसपास असणाऱ्या गर्द झाडीमुळे अंधार पसरलेला असतो अशावेळी उद्यानात असणाऱ्या लोकांना शोधणे आणि बाहेर काढणे एक मोठी कसरत असते. रात्री केवळ एकच सुरक्षा रक्षक उद्यानात असतो. त्यात आता हे उद्यान रात्री ९ पर्यंत चालणार म्हणजे लोकांना वेळ संपल्यावर बाहेर काढताना त्या एकट्या सुरक्षा रक्षकाला काय काय करावे लागेल सांगता येत नाही. असेही याबाबत बोलताना एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!