हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध

पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे.

मराठीत एक म्हण आहे, आपल्या घरातला कचरा काढ्याचा आणि दुसऱ्याच्या दारात टाकायचा. असेच काहीसे पवईमध्ये सध्या सुरु आहे. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये हॉकिंग झोनमुळे होणारा त्रास वाचावा म्हणून तेथील नागरिक आणि पालिका प्रशासन मिळून मध्यमवर्गीय ठिकाणांना निशाना बनवत आहेत, असा आरोप करत आयआयटीकरांनी सुद्धा आपल्या परिसरात येणाऱ्या हॉकिंग झोनला विरोध दर्शवला आहे.

पालिकेने डिसेंबर महिन्यात घोषित केलेल्या यादीनुसार आयआयटी येथील अपना बझार रोड, प्रशांत अपार्टमेंट रोड आणि गोखलेनगर भागांना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले होते. मात्र जानेवारीत नव्याने जाहीर केलेल्या यादीत आयआयटीमध्ये मुक्तेश्वर आश्रम रोडवर ६४, जैन मंदिर रोडवर २०, प्रशांत अपार्टमेंट रोडवर ३०, गोखले नगर मच्छीमार्केट येथे १७० आणि अपना बझार रोडवर २० ओट्यांना दाखवण्यात आले आहे. उलट पूर्वीच्या यादीत हिरानंदानी भागात सर्व प्रमुख रस्त्यांवर दाखवण्यात आलेले हॉकिंग झोन हटवून केवळ ९० फीट रोडवर (इस्ट अव्हेन्यू रोड) हॉकिंग झोन दाखवत संपूर्ण कॉम्प्लेक्सला दिलासा दिला आहे. मात्र आयआयटीत जादा हॉकिंग झोन दाखवून येथील सगळा भार आमच्या परिसरावर टाकला जात असल्याचे आयआयटी येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिक शंकरन याबाबत सोशल माध्यमातून विरोध दर्शवताना म्हणतात, हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्यामुळे येथील नागरिक आता आयआयटी किंवा इतर परिसरात खरेदीसाठी जाणार. तिथे दोन दोन रांगेत आपल्या गाड्या उभ्या करून परिसर जाम करणार. जर तुम्हाला हॉकिंग झोनला रोखायचेच असेल तर केवळ हिरानंदानीच का? सर्वच परिसरात हटवायला हवे.

“मुळात हिरानंदानीत राहणारे लोक आयआयटी भागातच आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. मग हॉकिंग झोनची गरज त्यांना आहे कि आम्हाला? आमच्याकडे आधीच एक भले मोठे मार्केट उपलब्ध आहे; मग आणखी एक उभे करून काय साध्य करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.”अशा प्रतिक्रिया याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, “त्यांच्याच मुद्यांवर बोलायचे झाले तर आयआयटी भागात दाखवण्यात आलेल्या सर्व हॉकिंग झोनच्या जागांची पालिकेने पुन्हा पाहणी करावी. शाळा, उद्याने आणि प्रार्थनीय स्थळे यांच्या १०० मिटरच्या आत ही सर्व ठिकाणे आहेत. गोखलेनगरजवळ तर लाखो रुपये खर्च करून उद्यानाच्या डागडुजीचे काम करणे सुरु आहे ते कचरा जमा करण्यासाठी काय? आधीच नागरिक मुलभूत गरजांसाठी लढत असताना हे लोक जे उपलब्ध आहेत त्यांना सुद्धा हिरावून घेण्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि याला आमचा पूर्ण विरोध आहे.”

काही स्वयंसेवी संस्थांनी सरळ आंदोलन आणि खळ-खट्याकचा मार्ग निवडायचा ठरवले असून, प्रशासनाने द्यायचा असल्यास सर्वांना सारखा न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आमच्या परिसरात हॉकिंग झोन बनू देणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes