एज्युकेशन लोनच्या नावाखाली आयटी प्रोफेशनलला एक लाखाचा गंडा

पवईकर आणि आयटी प्रोफेशनल असणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.१ लाख रुपयांना ऑनलाईन फसवले आहे. सदर महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. कर्ज घेण्यासाठी आर्थिक संस्थेचा शोध घेत असताना या महिलेने इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर संपर्क साधला, परंतु ती तिच्या बचतीतून १.१ लाख रुपये गमावून बसली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आयटी क्षेत्रात काम करणारी ही महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी १.५ लाखाचे शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. एका आर्थिक संस्थेचा इंटरनेटवर पोस्ट केलेल्या ग्राहक सेवा क्रमांकावर १४ मार्च रोजी तिने संपर्क साधला असता पंकज सिंह नावाच्या व्यक्तीने हा कॉल प्राप्त केला. आपली स्वत:ची ओळख कंपनीचा ग्राहक सेवा कर्मचारी म्हणून करून देत अर्ध्या तासाच्या आत कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन त्याने महिलेला दिले.

यावेळी त्याने महिलेकडून तिची खाजगी माहिती मिळवत, कमी व्याजदरावर कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तिच्या खात्यातून १.१ लाख उकळले. मात्र, त्यानंतर तिला आपण ऑनलाईन फसवणूकीला बळी पडल्याचे समजल्यानंतर तिने पवई पोलिसात तक्रार दाखल केली.

सायबर चोरट्याने आपला संपर्क क्रमांक आर्थिक संस्थेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर पोस्ट केला होता. याबाबत पोलिसांनी आर्थिक संस्थेशी संपर्क साधत त्यांच्या नावावर फसवणूक केली गेली असून, सायबर चोरट्याने संस्थेच्या टोल फ्री नंबर सोबतच आपला फोन नंबर इंटरनेटवर पोस्ट केल्याची माहितीही संस्थेला दिली आहे.

“पैशाचा मागोवा घेण्यासाठी रक्कम कोणकोणत्या खात्यात वळवण्यात आली आहे याबाबत आम्ही बँकेकडून तपशील मागविला आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!