२.५ दशलक्ष पौंडचे आमिष दाखवून पवईत महिलेची ४५.६९ लाखाची ऑनलाईन फसवणूक

पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली आहे.

पवई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या महिलेने असा आरोप केला आहे की, २१ ऑगस्ट रोजी तिला ६७ वर्षीय युके येथील रहिवाशी बर्था मेलॉन यांचा ईमेल प्राप्त झाला होता. मला तुमच्या देशात धर्मादाय कार्यासाठी तुम्हाला २.५ दशलक्ष पौंड दान करायचे आहेत, अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधा असे त्यात म्हटले होते. यात एका वकिलाचा ईमेल आयडी देखील देण्यात आला होता ज्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते.

वकिलाने मला सेरदरली गुरसेल नावाच्या महिलेचा ईमेल पत्ता पाठविला, ती तपशील पडताळणी करेल आणि त्यानंतर पैसे हस्तांतरित केले जातील. तसेच तिच्याकडूनच डीपॉजीट प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सुद्धा घेण्यास सांगितले होते, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार यांनी म्हटले आहे.

गुरसेल यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याची आपली ओळख तक्रारदार यांना सांगितली होती. “गुरसेल याने प्रमाणपत्र मिळाले का अशी इमेलवर तक्रारदार यांच्याकडे चौकशी करत रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला तिला ८९००० देण्यास सांगितले होते,” अशी माहिती यासंदर्भात बोलताना पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.

ते पुढे म्हणाले, “तिने ही रक्कम हस्तांतरित करताच तिला बँकिंग अप्लिकेशन डाउनलोड करून कर भरणे आणि कर कोड डीकोडिंग करण्याच्या बहाण्याखाली आणखी ४४.७१ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.”

१० ऑक्टोबरला सायबर ठगानी तिला क्रेडिट कार्ड खरेदी करण्याची गरज असल्याचे सांगून ५.८७ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र वारंवार पैशांची मागणी करणे संशयास्पद वाटल्याने तक्रारदार महिलेने पैसे देण्यास नकार देत यापूर्वी दिलेले पैसे परत मागितले. ज्यानंतर फसवणूक करणार्‍यांनी तिच्याशी संपर्क बंद केला.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!