पद्मश्री सिंधुताई सपकाळ करणार बोधवारीमध्ये तरुणाईला मार्गदर्शन

  • यंदाच्या बोधमार्ग फाऊंडेशनच्या डिजीटल अंतर्वारीमध्ये माईंचा सहभाग
  • माईसोबत मनाची डिजीटल अंतर्वारी
  • जगभरातील विविध भाषिक तरुणाईचा उत्फुर्त प्रतिसाद
  • यंदा डिजीटली अनुभवा मनाची ‘बोधवारी’

बोधमार्ग फाऊंडेशनतर्फे १२ जुलै ते २० जुलै दरम्यान ऑनलाईन अंतर्वारी अर्थात बोधवारी साजरी करण्यात येत आहे. या वारीला हजारो लेकरांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ या आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. बोधमार्ग फाऊंडेशनचे संस्थापक विभूश्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी आयोजित केली जात आहे. करोनाकाळात तरुणाईला निराशेची जी मरगळ आली आहे ती झटकून टाकण्यासाटी माई या बोधवारी दरम्यान तरुणाईला मार्गदर्शन करतील. करोनाकाळातील एकूण परिस्थितीमुळे झुंजण्याची प्रेरणा आपल्या संतांकडून घेत सत्तरीतील माई या सर्व परिस्थितीशी झुंज देत आहेत. ही झुंज माई विविध संतांच्या कवनामधून तरुणाईसोबत शेअर करणार आहे.

बोधवारीच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे- सायं. ७.०० ते ७.१५ – प्रास्ताविक, बोधमार्ग फाऊंडेशन व बोधवारीची माहिती. सायं ७.१५ ते ७.२५ – विठ्ठल क्रियाची माहिती. सायं. ७.२५ ते ७.४५ – विठ्ठल क्रिया शिका. सायं. ७.४५ ते ८.०५ – दरदिवशी विभूश्री पसायदानाच्या एका ओळीचे पारायण करतील. वास्तविक जीवनात ते कसे वापरावे याचे मार्गदर्शन करतील. रात्रौ. ८.०५ ते ८.२० – सिद्धकिर्तनातून नादयोग अनुभवा. रात्रौ. ८.२० ते ८.३० – पाहुण्यांचा सत्कार आणि उपस्थितांचे मतप्रदर्शन

बोधमार्ग फाऊंडेशतर्फे माऊली प्रकल्पांतर्गत विविध क्षेत्रातील माऊलींचा सन्मान केला जातो. माऊली म्हणजे वात्सल्याची सावली. या सावलीची अनुभूती देणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई. देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उत्कर्ष आणि पुनर्वसनाचे कार्य ही संस्था करते तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करते. या वंचित महिलांची माऊली बनून साईचे संस्थापक विनय वस्त गेल्या २७ वर्षांपासून हे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बोधवारीमध्ये त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजे अशा माऊलींची मातृसंस्थाच जणू. या माऊलीच्या आभाळाएवढ्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून बोधमार्ग फाऊंडेशनतर्फे माईंना गौरविण्यात येणार आहे.

विठ्ठल भक्ती विविध काव्यामधून आपल्याला नेहमीच आकर्षित करत असते. यावेळी बोधमार्ग फाऊंडेशनने विठ्ठ्लभक्तांसाठी त्यांच्या मनाला तृप्त करणाऱ्या तीन काव्यरचना तयार केल्या आहेत. या डिजीटल बोधवारीला गायक मंगेश बोरगावकर, अभिनेता विनोद गायकर यांचा देखील सहभाग असणार आहे.

मनाला उभारी देणारी यंदाची डिजीटल अंतर्वारी बोधवारी

या करोना काळात ‘वात्सल्याची माऊली’ मना- मनात जागवा असे आवाहन माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी तरुणाईला केले आहे.

“सद्यकाळात करोना सारख्या सांसर्गिक आजाराने व त्यासोबत उदभवलेल्या परिस्थितीमुळे जगभरातील मनुष्य मनाने खचला आहे. त्याच्यामध्ये एकप्रकारची नकारात्मकता आली आहे. ही नकारात्मकता दूर करुन त्यास आंतरिक मन:शांतीची अनुभूती देणारी ही बोधवारी मनाला निश्चितच एक उभारी देईल,” असे याबाबत बोलताना विभूश्री यांनी म्हटले.

ही बोधवारी विनामूल्य असून, अंतर्वारी ऑनलाईन असल्याने उपस्थितीसाठी तांत्रिकदृष्ट्या मर्यादा आहेत. या बोधवारीमध्ये सहभाग घेण्यासाठी ८०८०८०८४५५ किंवा [email protected] या मेल आयडीवर नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांची नोंदणी करता येणार आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!