जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे

सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती.

सर्विस रोडला खड्डे

ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात रस्त्यावर पडलेले खड्डे

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरु असते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा दबाव हा खूपच कमी आहे. मात्र तरीही येथील सर्विस रोडवर सांडपाणी येवून दुर्गंधी पसरणे, खड्डे पडणे असे प्रकार घडतच आहेत.

लॉकडाऊनमुळे पालिकेतर्फे करण्यात येणारी अनेक पावसाळा पूर्ण कामे रखडलेलीच आहेत. पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी कोरोनाबरोबर लढण्यासोबतच पावसाळापूर्व कामे झाल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात परिसरात कामे झाली नसल्याचा दावा अनेक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी केला आहे. पवई परिसरातील जेविएलआरवर मुख्य मार्गाच्या मधोमध मेट्रो-६ प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा दबाव हा सर्विस मार्गावर वाढला आहे. यामुळेच जेविएलआर वर सर्विस रोडला ठिकठिकाणी खड्डे पडत आहेत. या मार्गावर हिरानंदानी बस थांब्याजवळ असणाऱ्या खड्यात गाडी गेल्याने एक दुचाकी चालक प्रसाद मेस्त्री जखमी झाल्याची घटना घडली होती.

अशाच प्रकारे गांधीनगर येथे एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या जेविएलआरवरील सर्विस रोडवर आयआयटी मार्केटजवळील ट्रिनीटी चर्च येथून गांधीनगर उड्डाणपूल या भागात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पालिकेने दुरुस्तीचे काम केले, मात्र काही दिवसातच या भागात पुन्हा खड्डे निर्माण झाले. या संदर्भात येथील स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी पालिकेकडे तक्रार केली होती.

“खड्डे पडल्यानंतर या मार्गावर बेरीकेड लावत रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यात आला होता. मात्र हा काही पर्याय नाही, यामुळे मी पालिकेला तक्रार करत लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती,” असे मोरे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

या संदर्भात ‘आवर्तन पवई’ने पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मुसळधार पाऊस सुरु असून, पावसाने उघडीप घेताच दुरुस्तीचे काम करतो, असे सांगितले होते.

स्टॉप प्रेस

सोमवारी रस्त्याच्या दुरुस्तीचे सुरु असणारे काम

मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पालिका रस्ते विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी येथील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. “मी याबाबत पालिका अधिकाऱ्यांना हे तात्पुरते काम पुन्हा उखडत खड्डे पडतील असे सांगितले असता. त्यांनी आम्ही लवकरच रस्ता डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले,” असे याबाबत बोलताना मोरे यांनी सांगितले.

“पालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरुपात केली जाणारी ही कामे धोक्याची घंटा आहे. अनलॉक सुरु झाल्यामुळे हळूहळू अनेक कर्मचारी आपल्या मोटारसायकल किंवा खाजगी वाहनाने या मार्गाने कार्यालयात जात असतात. अशावेळी पुन्हा खड्डे निर्माण झाले आणि त्यात अडकून पडून जर कोणी गंभीर जखमी झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल ही पवईकरांनी याबाबत उपस्थित केला आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

#powai #JVLR #Adi_Shankaracharya_Marg #Service_Road #Potholes #BMC_S_Ward

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!