हिरानंदानीमध्ये १७ वर्षीय तरुणीचा २१व्या मजल्यावरून पडून मृत्यू; मृत्यूचे गूढ

पवईच्या हिरानंदानी भागातील एका इमारतीच्या २१व्या मजल्यावरून पडून १७ वर्षाच्या मोलकरणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पवईमध्ये घडली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पवई पोलीस अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून अधिक तपास करत आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या तरुणीचा मंगळवारी हिरानंदानी येथील हेरीटेज इमारतीच्या २१ व्या मजल्यावर असणाऱ्या घरात कामाचा पहिला दिवस होता. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास येथील एका सुरक्षा रक्षकाला जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्याने पाहिले असता ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती. त्याने त्वरित आपले वरिष्ठ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्याना यासंदर्भात माहिती दिली.

“तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले”, असे पोलिसानी सांगितले.

“तरुणी पडली कि तिने आत्महत्या केली हे अजून अस्पष्ट आहे. मात्र तिच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट मिळून आलेली नाही. जमिनीवर पडलेल्या तरुणीच्या बाजूलाच झाडू देखील पडला होता. तिच्या आत्महत्येची शक्यता कमीच आहे”, असे पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तपासी अधिकारी यांनी याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सांगितले कि, “इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये तरुणी इमारतीत प्रवेश करताच इमारतीच्या सर्वात वरच्या माळ्यावर गेलेली दिसत आहे. मात्र काही वेळातच ती पुन्हा २१व्या माळ्यावर परतली आहे. त्यामुळे ती नक्की सर्वात वरच्या माळ्यावर का गेली? तिच्या मनात आत्महत्येचा विचार होता का? आणि कदाचित इमारतीचे टेरेस बंद असल्याने ती पुन्हा खाली २१ व्या माळ्यावर आली का? की पहिला दिवस असल्याने चुकून ती वरच्या माळ्यावर गेली, हे सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत, याबाबत आमचा तपास सुरु आहे.”

“तरुणीने आत्महत्या केली की काम करताना पाय घसरून खाली पडली याचा तपास सुरु आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत यांनी सांगितले.

घरकाम करणारी महिला धोकादायक स्थितीत खिडकीजवळील भागात साफसफाईचे काम करताना वायरल व्हिडीओमधील छायाचित्र

मुलगी पडल्याच्या काही वेळानंतरच दुसरी एक महिला इमारतीच्या बाहेर धोकादायक स्थितीत सफाईचे काम करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. सोबत काही रूम मालक खिडकीच्या काचा आणि रुमच्या बाहेरील भाग या घरकाम करणाऱ्या महिलांना साफ करण्यास सांगतात. काही एक्स्ट्रा पैशांच्या मोबदल्यात महिला अशा धोकादायक ठिकाणी उतरून हे काम करतात. त्यामुळे हे त्वरित थांबवावे आणि घरकाम करणाऱ्या महिलांना हे धोक्याचे काम केवळ काही अधिक पैशांच्या मोबदल्यात करायला लावणाऱ्या लोकांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, असा संदेशही देण्यात येत आहेत.

तरुणीच्या आई वडिलांनी आत्महत्येचा दावा पूर्णपणे नाकारला आहे. तिचे लग्न ठरले आहे. ती आनंदात होती त्यामुळे ती आत्महत्या करू शकत नाही, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तिच्या पालकांनी म्हटल्याचे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “मात्र रूम मालकिणीने तिला उडी मारताना बघितल्याचा जवाब दिला आहे. तरुणी घरकाम करताना बेडरुममध्ये साफसफाई करत होती. याचवेळी तिने उडी मारून आत्महत्या केल्याचे रूम मालकिणीने दिलेल्या जवाबात म्हटले आहे.”

पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. तरुणी जमिनीवर पडली तेव्हा पाठीवर पडली होती. कबूतरांसाठी लावलेली जाळी हटवण्यात आली होती. मुलीचे पालक आणि रूम मालक यांचे जवाब आणि परिस्थितीजन्य पुरावे अशा बऱ्याच गोष्टीं पोलिसांच्या हाती असून, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे.

“प्राथमिक अहवालानुसार तरुणीच्या डोक्याला जबर जखम झालेली आहे. डोक्याला मार लागल्याने आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तिच्या शरीरावर खरचटल्याच्या साध्या खुणा आहेत, मात्र कोणतेही हाड मोडल्याचे समोर आलेले नाही. आमचा तपास सुरु आहे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. आवश्यकता वाटल्यास गुन्हा नोंद करून कारवाई करू”, असे पवई पोलिसांनी सांगितले.

हिरानंदानीतील याच इमारतीवरून उडी मारून घरकाम करणाऱ्या तरुणींनी आत्महत्या केल्याची घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. २०१५ साली आजारपणाला कंटाळून एका महिलेने १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

__________________________________________________________________________________________________________________________________________________
तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!