पवई आरे मार्गाचे १८.३० मीटरपर्यंत रुंदीकरण

पवई-आरे मार्गाचे रुंदीकरणात पवई उद्यानाचा भाग जाण्याची शक्यता.

पवईकडून आरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. १२ मीटर रुंदीच्या या रस्त्याला १८.३० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. मात्र, यासाठी पवई उद्यानाचा जवळपास १,६१२ चौरस मीटरचा भाग जाणार असल्याची माहिती समोर येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड व्यतिरिक्त पवईवरून फिल्टरपाडा, आरे मार्गे थेट गोरेगावकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येते. मात्र, हा मार्ग दुपदरी असल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच सध्या १२ मीटर रुंदीच्या असणाऱ्या या रस्त्याची रुंदी १८.३० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. साकीविहार ते चिन्मया मिशन पर्यंतच्या या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पवई उद्यानाचा जवळपास १ हजार ६१२ चौरस मीटर भाग वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिठी नदीवरील पुलाच्या निर्मितीनंतर जेविएलआरवर मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता गोरेगावकडे जाणारया प्रवाशांनी पवई उद्यान, फिल्टरपाडा, आरे कॉलोनी मार्गे पश्चिम द्रुतगतीवर गोरेगावकडे जाणे पसंत केले आहे. वाहतूक सल्लागारांच्या मूल्यांकनानुसार भविष्यातील वाहतुकीतील वाढ लक्षात घेऊन हा रस्ता १८.३० मीटरपर्यंत करण्याची शिफारस केल्याचे पालिका प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे. या निर्णयाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

या बातमीला दुजोरा देतानाच स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे म्हणाल्या, “शोर्टकट असल्याने या परिसरातून वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. जे पाहता या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी आणि पाठपुरावा आम्ही करत होतो. अखेर आता त्याला मंजुरी मिळाली आहे.”

“९० फुट रुंदीच्या या रस्त्याच्या मार्गात येणारी दुकाने आणि घरांना हटवण्यासाठी पालिकेतर्फे पाहणी करून नंबर देण्याचे काम सुरु होत आहे. योग्य ठिकाणी स्थलांतर होताच पुढील कामाला सुरुवात होईल,” असे याबाबत बोलताना शाखाप्रमुख मनीष नायर यांनी सांगितले.

मात्र या प्रकल्पात पवई उद्यानाचा काही भाग जाणार असल्याची माहिती समोर येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. “पालिकेच्या विकास आराखड्यात या रस्त्याचे नियोजन करण्यात आले नव्हते. १७९९ मध्ये पवई तलावाच्या निर्मितीपासून हे उद्यान अस्तित्वात आहे. या उद्यानात अनेक जुनी झाडेही आहेत. या रुंदीकरणात झाडांचाही बळी जाणार आहे. आमचा रस्ता निर्मिती किंवा कोणत्याही विकासाला कधीच विरोध नाही. मात्र आधीच पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना विकासाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल आणि निसर्गाची होणारी हानी कितपत योग्य आहे?” असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

, , , , , , , ,

2 Responses to पवई आरे मार्गाचे १८.३० मीटरपर्यंत रुंदीकरण

  1. ND January 26, 2022 at 7:25 am #

    You are stating a traffic problem.
    But if you can see your published image, you have the reason i.e. unauthorised parking.

    • आवर्तन पवई January 26, 2022 at 4:40 pm #

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियांबद्दल खूप खूप आभार. आपण मांडलेली समस्या ही अगदी बरोबर असून, आम्ही याबाबत वाहतूक विभागाशी पाठपुरावा करू.

      आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि बातमीत लावलेला फोटो हा पवई उद्यानाचा भाग जाणार आहे असे समोर येत असल्याने त्याच्या संदर्भ देण्यासाठी आहे. दुसरी महत्वाची माहिती अशी कि वाहतूक कोंडी होते आहे असे आम्ही (आवर्तन पवई) म्हणत नसून असे वाहतूकीचा सर्वे करणाऱ्या यंत्रणेचे म्हणणे आहे आणि तसाच उल्लेख बातमीत आहे. उद्यानाच्या पुढील भागात हा रोड निमुळता होवून जात तिथून वाहतूक कोंडीला सुरुवात होते ज्याचे लोन मागे जेविएलआर पर्यंत पोहचते. हा मार्ग फिल्टरपाडा-आरे टोल नाक्यापर्यंत अरुंद असाच आहे. तेव्हा बातमीचा संपूर्ण संदर्भ समजून घ्यावा… धन्यवाद !

      आवर्तन पवई वृत्तसंपादक

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!