संपत्तीसाठी मृत आईला केले जिवंत; तिघांना अटक

वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्काने मुलांनाच अधिकार मिळतो. मात्र ही संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधी कधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुद्धा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखून आपली आई जिवंत असल्याचे भासवून, २८५ करोडच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मेणबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संचालक असणाऱ्या व्यावसायिक सुनील गुप्ता, त्याची पत्नी राधा आणि मुलाला नोएडा पोलिसांनी सोमवारी पवईतील त्यांच्या घरातून अटक केली. नोएडा येथील भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

सुनील गुप्ता, त्याची पत्नी, मुलगा अभिषेक, सहाय्यक बी एन शुक्ला, आर कुमारन आणि दोन अज्ञात इसम यांच्याविरोधात फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि धमकावण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुनील यांनी आपल्या मुलाच्या नावावर सर्व संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या मृत आईला खोट्या कागदपत्रांच्या आधारे जिवंत केले होते.

नोएडा सेक्टर २० पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, गुप्ता यांची आई कमलेश रानी यांनी नोव्हेंबर २००३ मध्ये मुंबईतील सब-रजिस्ट्रार कार्यालयात इच्छापत्र नोंदणी केली होती. ज्यामध्ये त्यांनी एसटी रोडवरील त्यांची मालमत्ता त्यांची दोन मुले सुनील आणि विजय यांना संयुक्तपणे देण्यात यावी असे नोंदवले होते. तथापि, त्यांची आई कमलेश राणी यांच्या मृत्यूच्या सात दिवसानंतरच १४ मार्च, २०११ रोजी सुनील आणि त्यांच्या पत्नीने ही संपूर्ण संपत्ती त्यांच्या दोन मुलांना आजीने बक्षीसपत्र करून दिला असल्याचा डाव आखला, असे पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

इंग्रजी दैनिकाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी त्यांनी आई कमलेश राणी जिवंत असल्याची, बक्षिसपत्राची खोटी कागदपत्रे तयार करून उप-रजिस्ट्रारकडे शपथपत्र सादर केले. ज्यासाठी त्यांचे कायदे सल्लागार बी एन शुक्ला आणि आर कुमारन यांनी बक्षीसपत्राची साक्षी दिली.

सुनील आपल्या पालकांच्या मृत्यूनंतर कंपनीचे खाते हाताळत असल्यामुळे विजय गुप्ता यांना याबाबत कधीही शंका आली नाही. विजय हे नोएडाच्या सेक्टर १५ ए मध्ये राहतात, तर सुनील आणि त्याचे कुटुंब पवईतील, हिरानंदानी गार्डन्समध्ये राहतात.

२२ ऑक्टोबरला तीन अज्ञात इसम आपल्या सेक्टर १५ येथील कार्यालयात आले आणि हल्ला केला. सुनील आणि इतरांविरुद्ध पोलिसांकडे कोणतीही तक्रार न-करण्याची धमकी दिली. असे सेक्टर २० पोलिस ठाण्यात विजय यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सुरुवातीला त्यांनी सेक्टर २० पोलीस ठाणे आणि एसपी गौतमबुद्ध नगर यांना तक्रार अर्ज देवूनही काहीच कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी सूरजपूर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सेक्टर २० एसएचओला आरोपी विरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

न्यायालयाच्या दिशानिर्देशानंतर सुनील, त्यांची पत्नी, अनुराग आणि अभिषेक, साथीदार बीएन शुक्ला आणि आर कुमारन आणि अज्ञात इसमांविरोधात भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६७ (मौल्यवान दस्तऐवज बनावट तयार करणे) ४६८ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटे दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्र खरी म्हणून वापरणे), ३२३ (दुखापत करणे), ५०६ (धमकावणे) आणि ५०४ (शांततेचा भंग करण्याचा हेतूने अपमान), ३४ (एकाच हेतूने अनेक लोकांनी केलेले कार्य) नुसार गुन्हा नोंद करून सुनीलसह त्याच्या पत्नी आणि एका मुलाला सोमवारी अटक करण्यात आली.

मुंबई न्यायालयातून ट्रांझिट रिमांड घेवून नोएडा येथे मंगळवारी सूरजपूर कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes