पवईत दिवसाढवळ्या बाईकस्वारांनी पळवली महिलेची सोन्याची चैन

आयआयटी, पवई येथील जीएल कंपाऊंडजवळ कामावरून परतत असणाऱ्या एका महिलेची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सोन्याची चैन खेचून पळवल्याची घटना पवईत घडली. मिना पंडागळे असे या महिलेचे नाव असून, त्या गरीबनगरमध्ये राहतात.

मिना या सकाळी आपल्या सहकारी महिलांसोबत घरी परतत असताना हिरानंदानी हॉस्पिटलजवळ असणाऱ्या हॉटेल गोल्ड कॉइन जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी गळ्यातील दोन सोन्याच्या चैन खेचून तेथून पळ काढला.

“आयआयटीकडून हिरानंदानीकडे बाईकवरून जाणाऱ्या दोन इसमांपैकी एक गाडीवरून उतरून आला व पाठीमागून चैन खेचून पालट जावून गाडीवर बसला.” मला काही कळण्याच्या आतच त्यांनी तेथून पोबारा केल्याने बाईकचा नंबर दिसला नसल्याचे मिना यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबत सांगितले.

याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भादवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

“आम्ही परिसरातील सिसिटीव्ही फुटेज तपासून पाहत आहोत. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पोलीस उप-निरीक्षक प्रियांका पाटील यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

“जवळच्या परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांचे चेहरे अस्पष्ट येत असल्याने ओळख पटू शकलेली नाही. चांगल्या दर्जाचे कॅमेरे नसल्याने नंबर प्लेटही दिसून येत नाही आहे,” असे अजून एक अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

पंचकुटीर येथे सुद्धा अशाच प्रकारे सोनसाखळी चोरीची घटना गेल्याच आठवड्यात घडली होती. सलग दोन घटनांमुळे पवईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी होत आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!