एसएमशेट्टी रोड वाहतुकीसाठी खुला

सेन्ट्रल एजेन्सीच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली या दोन भागांना जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आजपासून (बुधवार, २५ डिसेंबर) हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, आयआयटी स्टाफ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक राणे काका आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पावसाळ्यापूर्वी पवईतील अनेक रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने सेन्ट्रल एजन्सीच्या माध्यमातून सुरु करण्यात आली होती. यातील हिरानंदानी आणि चांदिवली भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा असणाऱ्या एस एम शेट्टी शाळा मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे काम सुद्धा एप्रिल महिन्यापासून सुरु करण्यात आले होते.

जवळपास १ वर्षाचे कंत्राट असणाऱ्या या कामामध्ये रस्ता निर्मिती आणि गटार निर्मिती अशा दोन्ही कामांचा समावेश होता. एप्रिल महिन्यात सुरु झालेल्या या कामानुसार रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटाराच्या पुनर्निर्मितीचे काम कंत्राटदाराने पूर्ण केल्यानंतर शाळेच्या समोरील जलवायू चौक ते म्हाडा इमारत या भागातील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी संपवण्यात आले होते.

१३ नोव्हेंबरपासून पुन्हा म्हाडा इमारत ते आयआयटी रहिवाशी कॉलनी पर्यंतच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असल्याचे आणि संपूर्ण रस्ता खोदण्यात आल्याने या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक जेव्हीएलआरमार्गे वळवण्यात आली होती. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करत बस क्रमांक ३९२ च्या मार्गावरून या बस दरम्यानच्या काळात चालवण्यात आल्या आहेत. एसएम शेट्टी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने आता लवकरच बसेस सुद्धा या मार्गावरून सुरु करण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

मोठी वाहतूक कोंडी फुटली

या मार्ग बदलामुळे पवई आणि चांदिवलीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे पवईकर आणि चांदिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यातच लेकहोम कॉम्प्लेक्समधील रोड हा खाजगी मालकीचा असल्याचे सांगत प्रशासनाने हा मार्ग बंद केल्याने बरेच दिवस शाळेत आपल्या मुलांना घेवून जाणाऱ्या नागरिकांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. कधी कधी तर वेळेत शाळेत पोहचू न शकल्यामुळे शाळेला सुट्टी झाल्याची तक्रार सुद्धा काही नागरिकांनी केली होती.

पंचसृष्टी कॉम्प्लेक्स रोड खाजगी आहे

चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणारा एसएमशेट्टी रोड जेवढा महत्वाचा आहे तेवढाच पंचसृष्टी कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड नागरिकांसाठी महत्वाचा आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली असून, हा मार्ग खाजगी असल्याचे सांगत फेडरेशनच्यावतीने ‘बाहेरील वाहनांना पंचसृष्टी कॉम्प्लेक्स रहिवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवेशबंदी आहे’ अशा संदेशाचे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!