बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून मास्क का लावला नाही म्हणत लूट

बीएमसी अधिकारी असून, मास्क का लावला नाही? असे सांगत एका छोट्या व्यावसायिकाला लुटल्याची घटना पवईत घडली आहे. कोरोना काळात असणाऱ्या या सक्तीचा फायदा घेवून, लुटारूनी नवीन शक्कल लढवली आहे. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईसह अडकलेला महाराष्ट्र आता हळूहळू निसटू लागला आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी मास्क घालणे आवश्यक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन नजर ठेवून असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. याचाच फायदा आता काही भामटे घेवू लागले असून, बीएमसी अधिकारी, पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी सक्रीय आहे. अशाच प्रकारे पवईतील एका छोट्या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पवईत नुकतीच उघडकीस आली आहे.

पवईतील आयआयटी मेनगेट समोरील भागात राहणारे नाडार हे पाव आणि ब्रेड विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमी प्रमाणे आयआयटी मेनगेट समोरील परिसरातून ब्रेड घेवून ठिकठिकाणी देण्यासाठी निघाले. तुंगागाव येथे ब्रेडची डिलिव्हरी करून ते परतत असताना पवई प्लाझा येथे एका दुचाकीस्वाराने येवून त्यांना थांबवले. आपण बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत ‘तुमने मास्क नही लगाया हैं | साहब बुला रहें हैं, तुमको सुनाई नही देता क्या? चलो साहब के पास’ म्हणत गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र नाडार याने ‘मैं इधरही फाईन भरता हुं|’ असे त्यास सांगितले. त्यावेळी त्याने ‘अरे तुम ब्रेड बेचनेवाला गरीब आदमी हैं, तू पैसा कहां भरता हैं| तू मेरे साथ चल और साहब को सॉरी बोल, साहब तुम्हे माफ कर देगा|’ असे म्हणत त्याला गाडीवर बसवून ९० फिट रोडवर आणले.

‘साहब लोग तुम्हारे जेब से पुरा पैसा निकाल लेगे, पैसा मेरे पास दो’ असे त्यास सांगितले. नाडार यानेही त्याच्या खिशातील ७,५०० रुपये काढून त्या व्यक्तीला दिले. काही वेळाने ‘साहब आ रहें हैं, तुम बाजू मे रुको’| असे म्हणत तो मोटारसायकल घेवून तिथून निघून गेला, तो परत आलाच नाही.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच नाडार याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई परिसरात घडलेली ही पहिली घटना नसून, सांताक्रूझ भागात एका व्यावसायिकाला बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून एका भामट्याने ५० हजाराची फसवणूक केली होती. तर एमआयडीसी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ४ लोकांना क्लीनअप मार्शल असल्याचे सांगत १ लाखाची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अशा अनेक घटना सध्या मुंबईमध्ये घडत असून, प्रशासनाच्या नियामांचा फायदा घेवून भामटे लोकांना फसवत आहेत. त्यामुळे आपल्या जवळील कोणतीही मौल्यवान वस्तू कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सोपवू नका. अशी व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!