देवीनगरकरांचा रस्ता कचऱ्यातून

प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे

देवीनगर भागात जाणाऱ्या रस्त्यावर पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य

भाजपा सरकार सत्तेत येताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक देत संपूर्ण देश कचरामुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत याच पक्षाच्या निवडून दिलेल्या पवईच्या नगरसेवकांपर्यंत ही हाक पोहचलेली दिसत नाही. म्हणूनच की काय येथील देवीनगर भागात जाणाऱ्या लोकांच्या मार्गावर अंथरलेली कचऱ्याची चादर उचलण्याचा त्यांना विसर पडला आहे. ज्यामुळे नाईलाजास्तव येथील नागरिकांना कचऱ्यातून प्रवास करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. रस्ते, पायाभूत सुविधांची स्वच्छता करण्यासोबतच देशाला कचरामुक्त करणे हे भारत सरकारच्या या सर्वात महत्वाकांक्षी मोहिमेचे मुख्य ध्येय आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्यामुळे या स्वच्छता अभियानाचे तीन-तेरा वाजल्याचेच पहायला मिळते.

विशेष म्हणजे भाजपाच्या कारकिर्दीत घोषित करण्यात आलेल्या या अभियानाचे याच पक्षाचे प्रतिनिधी धिंडवडे उडवत आहेत आणि पवई सुद्धा त्यातील एक ठिकाण. पवईतील टेकडी भागात असणाऱ्या देवीनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांना अक्षरशः कचऱ्याच्या ढिगांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या भागात निवडून दिलेल्या नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी दोघेही याच पक्षाचे आहेत.

‘येथील चैतन्यनगर, इंदिरानगर, देवीनगर, गरीबनगर या भागातून निघणारा कचरा हा येथून काही अंतरावर असणाऱ्या खदानीत फेकला जातो आहे. या खदानीतूनच पुढे टेकडी भागात असणाऱ्या देवीनगरचा मार्ग जातो. मात्र या संपूर्ण मार्गात कचऱ्याचे ढीगच ढीग पडलेले असून, ना पालिका प्रशासन त्याला उचलायला येते आहे ना स्थानिक प्रतिनिधी त्याकडे लक्ष देत आहेत’ असे याबाबत बोलताना येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

स्थानिक रहिवाशी संतोष देढे यांनी याबाबत सांगितले कि, ‘आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार सर्वांना आमच्या परिसरात असणाऱ्या, कचरा, पाणी, शौचालय अशा मुलभूत सुविधांच्या तक्रारी दिल्या आहेत. मात्र यातील एकाही प्रतिनिधीने याकडे लक्ष घालण्याचे धाडस केलेले नाही. एक – दोन प्रतिनिधींनी तर येवून काम सुरु करण्याचे नारळ सुद्धा फोडले, प्रत्यक्षात मात्र कोणतेच काम झालेले नाही.

‘येथे दत्तक वस्ती योजने अंतर्गत पवई नागरिक सहकारी संस्थेला घरोघरी कचरा उचलण्याचे काम देण्यात आलेले आहे, मात्र आजतागायत ते या परिसरात फिरकले सुद्धा नाहीत. कचऱ्यात उत्पत्ती होणाऱ्या आजाराच्या मच्छर आणि किड्यासोबतच दुर्गंधीमुळे परिसरात आजार सुद्धा पसरत आहेत. पाठीमागे एकदा माजी नगरसेवक यांनी हातात झाडू घेवून सेल्फी सेशन करत येथील कचरा साफ केल्याचे फोटो सोशल मिडीयावर झळकावले होते. त्या सेल्फी सेशननंतर ते पुन्हा कधीच इकडे फिरकले नाहीत,’ असे सुद्धा याबाबत बोलताना येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

या संदर्भात आवर्तन पवई प्रतिनिधीनी पालिका एस विभाग घनकचरा विभागात तक्रार केल्यानंतर दुय्यम अभियंता प्रभाकर खोपकर आणि कनिष्ठ अभियंता शिरसाळे त्यांनी आज (मंगळवारी) परिसरात येवून पाहणी करून लवकरात लवकर सदर कचरा हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

, , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. आवर्तन पवई दणका:  देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला | आवर्तन पवई - July 6, 2018

    […] पवईने याबाबत “देवीनगरकरांचा रस्ता कचऱ्यातून” या मथळ्याखाली बातमी करत पालिका […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes