चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले पवई इंग्लिश हायस्कूलचे स्नेहसंमेलन

@सुषमा चव्हाण

यआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन “रिफ्लेक्शन” मंगळवारी अय्यप्पा मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात दणक्यात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती सुनितादेवी गोपाल शर्मा, सून सौदामिनी शर्मा व भारतीय सशस्त्र सेनेचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डिसेंबर, जानेवारी म्हणजे शाळा कॉलेजेसच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस. पवई इंग्लिश हायस्कूलने सुद्धा मंगळवारी अय्यप्पा मंदिर समोरील पालक आणि विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या मैदानात यावेळी आपला वार्षिक स्नेहसंमेलन थाटात साजरा केला.

माध्यमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोवांन आणि बार्बी डान्सने संपूर्ण मैदानाला ताल धरायला लावले. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले “ट्रिब्युट टू सोल्जर”. भारतीय सैनिकांचे जीवन आणि कहाणी या चिमुकल्यानी एवढ्या प्रभावीपणे मांडली की उपस्थितांनी उभे राहून याला मानवंदना दिली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा रॅम्प वॉक सुद्धा पहिल्यांदाच यावेळी पहायला मिळाला.

विद्यार्थ्यांच्या या उत्साहात अजून रंगत तर तेव्हा आली जेव्हा येथे सादर होत असणाऱ्या काही पंजाबी गाण्यांच्या वेळी स्टेजच्या पाठीमागे असणाऱ्या गुरुद्वाराच्या छतावर शिख बांधवानी विद्यार्थ्यांच्या तालात ताल मिळवत डान्स करून हर्षोल्हास साजरा केला. पाठीपाठी आलेल्या विविध पारंपारिक लोकनृत्यांनी व मायकल जॅकसन स्टाईल डान्सनी उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले.

कार्यक्रमाची सांगता करताना “मिले सूर मेरा तुम्हारा” या सुप्रसिद्ध गाण्यावरती सादरीकरण करत जाता जाता विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिला.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत आणि विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक कमावलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!