पोलीस असल्याची बतावणी करत महिलेचे २.१२ लाखाचे दागिने लांबवले

पोलीस असल्याची बतावणी करत पवईतील एका महिलेची फसवणूक करून तिच्याजवळील २.१२ लाखाचे दागिने भामट्यांनी लांबवले आहेत. बुधवारी पवई परिसरात ही घटना घडली असून, पवई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आपल्या कामासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी रस्त्यावर अडवले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे त्या महिलेला सांगत पवई परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नाकाबंदी आणि गस्त वाढवली असल्याचे सांगितले.

महिलेचाही त्यांच्यावर विश्वास बसलेला बघत त्यांनी तिच्याजवळ असणारे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. महिला दागिने पिशवीत ठेवत असतानाच बोलण्यात गुंतवून ठेवून मोठ्या हातचलाखीने दागिने साफ करत ते तिथून निघून गेले.

महिलेला आपले दागिने गायब असल्याचे लक्षात येताच तिने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

“परिसरातले सीसीटीव्ही फुटेज आम्ही मिळवले असून, गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलची नंबर प्लेट काढण्यात आली आहे. आम्ही दिसून येणारी गाडी आणि इतर माहितीच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहोत,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “लॉकडाऊनमुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी झाली आहे त्यामुळे मॉर्निंग वॉक किंवा कामासाठी बाहेर पडलेल्या व्यक्ती या टोळीच्या सहज सावज बनत आहेत. नागरिकांनी अशा भामट्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. असा कोणताही व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी पोलिसांना त्वरित संपर्क साधावा.”

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!