हिरानंदानीत ‘बॉंब’ बोंब; निघाले तापमान मोजणारे उपकरण

काल (सोमवार) दुपारी पवईतील हिरानंदानी शाळेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात इसमाने बॉंब ठेवला असल्याची बोंबा बोंब झाल्याने पालकांसह संपूर्ण पवई या बातमीने हादरून गेली. पालकांनी धावपळ करत आपल्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी सरळ शाळा गाठली. मात्र, पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर रिकामा करून बंद करत सुरक्षित केल्याने पालकांची चांगलीच धांदल उडाली. अखेर दोन तासानंतर पोहचलेल्या बॉंब स्कोडने दिसणारी वस्तू बॉंब नसून, कसलेतरी मोजमाप करणारे उपकरण असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पवईकरांचा जिव भांड्यात पडला.

मुंबईवर आतंकी हल्ला झाल्यास पवई हे मुंबईतील निशाण्यावर असणाऱ्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असल्याने याच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार असते. डेविड हेडलीच्या अटकेनंतर त्याने पवई आतंकवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आणि याची रेखी करण्यात आल्याचे सांगितले होते. येथील सुरक्षेवर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकांसह अनेक सरकारी यंत्रणांची नजर असते. अशातच एखादी छोटी अफवा सुद्धा संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरते.

रविवारची सुट्टी एन्जॉय केल्यानंतर पवईकरांचा सोमवार हा नेहमी प्रमाणेच आनंदात सुरु झाला होता. सगळे काही सुरळीत चालू असतानाच दुपार होता होता हिरानंदानी शाळेजवळच्या एका सुरक्षा रक्षकाला शाळेपासून काहीच अंतरावर एक वस्तू पडली असल्याची दिसली. त्याला वायरी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यात लाईट्ससुद्धा चमकत आहेत हे पाहताच त्याने त्वरित मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करत याची माहिती दिली.

“माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळावर पोहचून परिसर आणि आवश्यक वाटणाऱ्या इमारतींना मोकळे करून घेतले होते. संपूर्ण परिसर बंद करून त्या वस्तुजवळ कोणी जाणार नाही याची विशेष दक्षता घेतली होती.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक तुषार गरुड यांनी सांगितेले.

हिरानंदानी शाळेजवळ एक जिवंत बॉंब ठेवला असल्याची बातमी काही क्षणातच संपूर्ण परिसरात पोहचल्याने संपूर्ण पवई या बातमीने हादरून गेली होती. सोशल नेटवर्क, फोन सोबतच जे काही माध्यम उपलब्ध होईल त्याने लोक नक्की काय घडले आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. पालकांना माहिती मिळताच आपल्या पाल्यांना घेण्यासाठी त्यांनी एकच गर्दी परिसरात केली होती. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिसर आधीच बंद करून कोणालाच पुढे जाण्यास अनुमती देत नसल्याने लोक काहीतरी विपरीत घडले असल्याचेच संदेश बाहेर पोहचवत होते. त्यामुळे वातावरण आणखी तंग झाले होते.

अखेर दिड तासानंतर बॉंब स्कोडला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी तपासणी करून ते बॉंब नसून, कसले तरी मोजमाप करणारे उपकरण असल्याचे सांगितल्यानंतर पवईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

“आयआयटीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने वातावरणातील उष्णता मोजणारे उपकरण तयार केले आहे. सध्या वातावरणात होणाऱ्या बदलांना पाहता उपकरणाची प्राथमिक चाचणी कॅम्पसच्या बाहेर करण्यासाठी तिने संस्थेची अनुमती घेवून चाचणीसाठी ते उपकरण हिरानंदानी येथे ठेवले होते. मात्र याबाबत तेथील सुरक्षा रक्षकाला काहीच माहिती नसल्याने, ती वस्तू बॉंब सदृश्य दिसत असल्याचे पाहून पोलिसांना खबर दिली. आम्हालाही विद्यार्थिनीने किंवा शिक्षण संस्थेने याबाबत काहीच माहिती दिली नसल्याने आम्ही सुद्धा सुरक्षेच्या उद्देशाने सर्व परिसर बंद केला होता. बॉंब स्कोडने दिलेल्या माहितीनुसार सदर वस्तू हि प्राणघातक किंवा कोणास इजा पोहचवेल अशी नसल्यामुळे आणि शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग असल्यामुळे आम्ही विद्यार्थिनीचा जवाब नोंदवून घेतला आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!