हिरानंदानीत महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी अश्लिल वर्तन

वईतील चंद्रभान शर्मा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार तरुणी घरी परतत असताना हिरानंदानीतील इटरनिया इमारती समोर एका माथेफिरूने त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करून, अश्लील भाषेत बोलल्याची घटना आज सकाळी ११.४५ वाजता घडली. याबाबत पवई पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (डी), ५०९ नुसार गुन्हा नोंद करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी इसमाचा शोध सुरु केला आहे.

पवई विहार येथील बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार तरुणी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या घरी चालत परतत असताना “हिरानंदानीतील इंटरनिया इमारती जवळ आमच्या पाठीमागून वयाच्या तिशीत असणारा एक तरुण निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून जवळ येऊन थांबला. लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करू लागला, त्याकडे  दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो. मात्र त्या इसमाने परत पाठलाग करत अश्लील भाषेत बोलणे सुरु केले.” असे पवई पोलिसांच्या महिला अधिकाऱ्यांना दिलेल्या जवाबात विद्यार्थिनीनी सांगितले.

घटनेची माहिती कळताच घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक शिरसटसह पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

“आरोपीने डोक्यात हेल्मेट घातले नव्हते, आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याच्या मोटारसायकलच्या नंबरचे काही डिजिट आहेत, ज्यांच्या आधारावर आरटीओच्या मदतीने आम्ही तपास करत आहोत” असे यावेळी बोलताना झोन दहाचे पोलीस उपायुक्त रेड्डी यांनी सांगितले.

“आरोपी इसमास यापूर्वी सुद्धा परिसरात फेऱ्या मारताना आणि महिलांशी अश्लील वर्तन करताना पाहिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या पीडितांच्या संपर्कात येऊन त्या इसमाबाबत अधिक काही माहिती मिळते का? या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत” असेही याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!