हिरानंदानीत ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी; सतर्क पोलिस अंमलदारामुळे टळला अनर्थ


गुन्ह्यात वापरलेली होंडा अमेझ कार; चौकटीत गुन्हातील मुख्य सुत्रधार यतीन जैन आणि अमित सिंग

एका ज्वेलरला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना हिरानंदानीतील हायको मॉलसमोर घडत असतानाच पवई पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार सुनील मसुगडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मसुगडे यांनी दाखवलेल्या शौर्य आणि सतर्कतेसाठी पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे कौतुक करत सन्मान केला.

यासंदर्भात मारहाण करत जबरी चोरी करण्याच्या गुन्ह्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासाच्या आत २ आरोपींना अटक केली आहे. यतीन रमेश जैन (३६) आणि अमित उर्फ हना अमरजित सिंग (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पंजाब येथून आलेल्या आणखी दोन गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पवई पोलीस ठाण्याचे बीट क्रमांक ४चे इन्चार्ज मसुगडे आपल्या बीटवरून सकाळी ९.१० वाजता हिरानंदानी मार्गे पवई पोलीस ठाणे येथे जात होते. हायको मॉल समोरील भागात काही इसम क्रेटा कारमध्ये एका इसमास मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले. “मी माझी मोटारसायकल थांबवून ‘काय चालू आहे !’ असे विचारणा करताच कारमधून ३ इसम उतरून डी मार्टच्या दिशेने धावू लागले. मी त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एकाने बंदूक काढून माझ्यावर ताणली.” असे आवर्तन पवईशी बोलताना मसुगडे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काही क्षणातच तिघेही जवळच उभ्या एका गाडीत बसून, तिथून पसार झाले. मी परत येऊन मारहाण झालेल्या इसमाची चौकशी केली असता, त्याचे गलेरिया येथे ज्वेलरी शॉप असून, ते सर्व मिळून त्याला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत असल्याचे सांगितले. तसेच आरोपींनी त्याचे २ मोबाईल व कारची चावी देखील पळवून नेल्याचे सांगितले.”

घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्ही फुजेच्या आधारावर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पो.ह. दामू मोहोळ, पो.ना. वैभव पाचपांडे, पो.ना. प्रवीण सावंत, पो.शि. भरत देशमुख, पो.शि. सुर्यकांत शेट्टी, पो.शि. भास्कर भोये, पो.शि प्रशांत धुरी आणि महिला पोलीस शिपाई शितल लाड यांचे पथक तयार करून तपास सुरु करण्यात आला होता.


पवई पोलीस ठाणे बीट क्रमांक ४ प्रभारी सुनील मसुगडे यांचा सत्कार करताना परिमंडळ -१०चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी

“आमचा तपास सुरु असताना काही इसम तक्रारदार यांच्या इमारतीच्या बाहेर आणि त्यांचे दुकान असणाऱ्या परिसरात पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली. त्या अनुषंगाने आम्ही आरोपींचे फोटो तक्रारदार आणि इतर लोकांना दाखवून केलेल्या चौकशीत ठाणे येथील गोल्ड ट्रेडर यतीन जैन याचा सहभाग असल्याचे समोर आले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

“तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत चार बंगला येथील लॉजमध्ये झडती घेतली असता गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार यतीन जैन आणि अमित सिंग यांना आम्ही तेथून ताब्यात घेतले,” असे आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद लाड यांनी सांगितले.

“अमित हा डान्सर असून एका कार्यक्रमात दीड वर्षापूर्वी यतीन याच्याशी त्याची मैत्री झाली होती. दोघांनी हा संपूर्ण प्लान बनवत अमितने पंजाब येथून दोन व्यक्तींना या कामासाठी मुंबईत बोलावून घेतले होते. पंजाब येथून आलेले दोन्ही पाहिजे आरोपी यांच्या शोधात विविध राज्यात आम्ही पथके पाठवली आहेत,” असे पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

भादवि कलम ३९४ (दुखापत करून जबरी चोरी), ३२३ (दुखापत पोहचवणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या दृष्टीने अपमान करणे), ५०६ (मृत्यू किंवा जबर दुखापतीची धमकी), ३४ (सामायिक उद्देश) नुसार नोंद गुन्ह्यात पवई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली होंडा अमेझ कार (एमएच ०१ डीबी ४४७६) आणि पिस्तुल सदृश्य लायटर हस्तगत केला आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!