सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Powai-house-breaking-theft-accused-arrestedपवई परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुरुवारी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ लंब्या अरुण बाईत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पवई येथील एक घरफोडी आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

२ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मौल्यवान वस्तू आणि रोकड सापडली नसल्याने एका घरातील मोबाईल चोरी केल्याची घटना घडली होती. पोलीस चौकशीत चोरट्याने पत्रा आणि भिंत यांच्यामध्ये वेंटीलेशनसाठी असणाऱ्या जागेतून घरात प्रवेश करत ही चोरी केल्याचे समोर आले होते.

“घरात सगळे पुरुष कामगारच राहतात. रात्री झोपेत असताना आरोपीने पत्रा आणि भिंत याच्यामधील फटीतून प्रवेश करत घरात चोरी केली होती. सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे खबऱ्यांचे जाळे कार्यरत करून तपास सुरु असतानाच पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या ‘लंब्या भाई’ याने ही चोरी केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

पाळत ठेवून पार्कसाईट परिसरातून आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे.

“चौकशी सुरु असतानाच, पंचलीला इमारतीच्या पार्किंगमधून एक महागडी सायकल ३ महिन्यापूर्वी चोरीला गेल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात नोंद होती. त्या आरोपीचे वर्णन अटक आरोपीशी मिळत असल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्या गुन्ह्याचीही कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली ३० हजार किंमतीची बिटविन रॉकरायडर ही महागडी सायकल सुद्धा हस्तगत केली आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड  यांनी सांगितले.

आरोपी हा परिसरात पाळत ठेवून असे. गर्दी कमी असणारी ठिकाणे, मोकळी – शांत असणारी ठिकाणे हेरून तेथून मौल्यवान वस्तू, सायकल चोरी करत असे. “आरोपीचा अजूनही काही गुन्ह्यात सहभाग असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे,” असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

भादवि कलम ३७९ (चोरी), ४५७ (घरफोडी), ३८० (राहत्या घरातील चोरी) नुसार गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पुढील तपासासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस हवालदार दामू मोहळ, पोलीस नाईक अमित जगताप, पोलीस शिपाई भरत देशमुख, पोलीस शिपाई गणेश कट्टे, पोलीस शिपाई हिरा सूर्यवंशी आणि सचिन गलांडे  यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

, , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: