शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध पवईत मानवी साखळी

वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी पवईमध्ये रविवारी संध्याकाळी मानवी साखळी संयोजन समितीच्यावतीने आयआयटी मेनगेट येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

या अभिनव मानवी साखळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, युवक,महिला, शिक्षणप्रेमी सह सर्वपक्षीय पवईकरांनी सहभाग नोंदवला. आयआयटी मेनगेट ते आयआयटी मार्केटगेट या भागात जेव्हीएलआरवर साखळी स्वरूपात उभे राहून पवईकरांनी आपला निषेध नोंदवला. केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थी-युवकांना शिक्षण आणि रोजगार पुरविण्याची जबाबदारी निभवावी, याची सत्ताधारी पक्षांना जाणीव करून देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मिळून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा झेंडा न घेता पवईमध्ये या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत, कौशल्याधिष्ठीत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारीत असावे. तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार काम द्यावे. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा भत्ता मिळावा. अशा मागणी यावेळी साखळीत सहभागी आंदोलकांनी केली.

‘सरकारने शिक्षण आणि नोकरीचे बाजारीकरण केले आहे, यामुळे प्रत्येक वर्षी लाखो शिक्षित मुले बेरोजगार आणि चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सरकारला याबाबत आत्ताच जाग नाही आणून दिली तर पुढील काही वर्षात परिस्थिती अजून दयनीय होईल. म्हणूनच आम्ही त्यांना या मानवी साखळी स्वरूपातील आंदोलनातून जागे करण्याचे काम करत आहोत’ असे याबाबत बोलताना मानवी साखळीत सहभागी कॉम्रेड हरी घाडगे आणि महेंद्र उघडे यांनी सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!