देशातील पहिली मायक्रोप्रोसेसर चिप ‘अजित’ आयआयटी मुंबईने बनवली

पाश्चिमात्य आणि चीन देशाची मक्तेदारी असणाऱ्या मायक्रोप्रोसेसरवर आता भारताने सुद्धा नाव कोरले असून, देशातील पहिली ‘अजित’ ही मायक्रोप्रोसेसर चिप आयआयटी मुंबईने तयार केली आहे. या मायक्रोप्रोसेसरची रचना, आराखडा आणि उत्पादन संपूर्ण काम भारतात करण्यात आले आहे.

पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेची उलाढाल सुमारे ४०० अब्जांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत आहे. या उत्पादनांसाठी लागणाऱ्या मायक्रोप्रोसेसरची आयात ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र आता ही चिप भारतातच बनवली जाणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होणार आहे.

प्रा. माधव देसाई आणि आयआयटीतील नऊ संशोधकांच्या गटाने हा प्रोसेसर संस्थेतच तयार केला आहे. अजित प्रोसेसर हा इतर परदेशी प्रोसेसरच्या तोडीचा असल्यामुळे त्याची मागणी वाढू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास एका प्रोसेसरची किंमत १०० रुपयांपेक्षाही कमी होईल असा विश्वास सुद्धा याच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

अजितच्या निर्मितीसाठी प्रथमच शिक्षण, उद्योग आणि सरकार या तिन्ही क्षेत्रांतील लोक एकत्रित आले आहेत. या प्रोसेसरवर पाठीमागील दोन वर्षांपासून संशोधन सुरू होते. अजित चिपचा ७० ते १२० मेगाहर्टझ इतका काम करण्याचा वेग आहे. या प्रोसेसरची यशस्वी चाचणी झाली असून, लवकरच पुढील कामाला सुरुवात होईल.

मायक्रोप्रोसेसर हे एक प्रकारचे इंटिग्रेटेड सर्किट असते. काही मिलिमीटर आकार असणाऱ्या याचा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या उत्पनात याचा वापर होतो. मायक्रोप्रोसेसरचे उत्पादन करणे कठीण असल्यामुळे जगातील काही निवडक कंपन्याच मायक्रोप्रोसेसरची निर्मिती करतात. आता यात भारताचे सुद्धा नाव जोडले जाणार आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!