पवई किडनी रॅकेट: खोटी कागदपत्रे बनवणाऱ्या आरोपीला अटक

fake-certहिरानंदानी रुग्णालयातून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटसाठी खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा सुरु असलेला पवई पोलिसांचा शोध अखेर संपला आहे. पोलिसांसोबत लपाछपीचा डाव खेळत असणाऱ्या सईद अहमद खान (६७) याला पवई पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. खानने किडनी रॅकेटचा मुख्य सूत्रधार भेजेंद्र भिसेन याला सर्व खोटी कागदपत्रे पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी त्याला अंधेरी कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस सुरत येथील व्यावसायिकाची पत्नी दाखवून किडनी दिली जात असल्याची खबर १४ जुलै रोजी पवई पोलिसांना समाजसेवकांनी दिल्यानंतर पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया रोखत किडनी रॅकेटचा भांडाफोड केला होता.

या गुन्ह्यात पवई पोलिसांनी सुरुवातीला याचा मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेनसह नऊ आरोपींना अटक केली होती, ज्यात रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण समन्वयक निलेश कांबळेचा समावेश आहे. पुढील तपासात निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली. नंतर रुग्ण ब्रिजकिशोर आणि किडनी दाता शोभा ठाकूर यांना सुद्धा या गुन्ह्यात पवई पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यासाठी रुग्णांचे आणि दात्यांची खोटी कागदपत्रे बनवून देणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर शुक्रवारी खान याला पवई पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे.

“अटक आरोपींच्या कबुलीमध्ये खान याचा खोटी कागदपत्रे बनवून पुरवण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. रुग्ण आणि दाता यांना रक्ताचे नातेवाईक दाखवण्यासाठी बनावट रेशनकार्ड, आधारकार्ड, कोर्टाची कागदपत्रे आणि लग्नाचे प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे त्याने बनवली होती. मात्र, गेली तीन महिने तो आमच्याशी लपाछपी खेळत होता. अखेर शुक्रवारी त्याला पकडण्यात आम्हाला यश आले आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्याच्याकडून कागदपत्रे बनवण्यासाठी वापरलेला कॉम्पुटर, हार्ड डिस्क, प्रिंटर, रबर स्टम्प आणि जरुरी सामान यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भांदवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, १२०(ब) सह मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा (१९९४) नुसार अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!