कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा दावा करत, कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी पवईकर आणि निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने जाधव यांना अटक केली होती.

कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा निश्चित केल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांना नेमकी कधी आणि कुठे फाशी देणार याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही.

भारताकडून पाकिस्तानच्या या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.

जाधव यांचे कुटुंबीय राहत असलेल्या हिरानंदानी, पवईमधील सिल्वर ओंक इमारतीच्या आसपास सोमवारी दुपारपासूनच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील अज्ञात व्यक्तींना इमारतीत प्रवेश दिला जात नव्हता. इमारतीमधील कोणीही रहिवाशी किंवा जाधव यांचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कुटुंबियांविषयी किंवा या निर्णयाबद्दल बोलायला तयार नव्हते.

मूळचे सोलापूरचे असलेले कुलभूषण जाधव यांचे वडील आणि काका हे पोलीस दलात वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. मुंबईत कुलभूषण यांचे बालपण गेले असून, ते भारतीय नौदलात अधिकारी होते. मुदतीपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ज्यानंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता.

जाधव यांचे इराणमधून अपहरण करून बलुचिस्तानात नेण्यात आले आहे. ते भारताचे नागरिक आहेत, मात्र गुप्तहेर नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. परंतू पाकीस्तान सुरक्षा दलांनी कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा करत त्यांचा कबुली देणारा एक व्हिडीओ भारत सरकारला दिला होता.

कबुली व्हिडीओ आणि जाधव यांच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारावर पाकिस्तान लष्करी कायद्याचे कलम ३ आणि फिल्ड जनरल कोर्ट मार्शलचे कलम ५९ अन्वये कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्यात निर्णय देताना त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे पाकिस्तानच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता भारतानेही आक्रमक पवित्रा घेत १२ पाकिस्तानी कैद्यांच्या सुटकेचा निर्णय रद्द केला आहे. उद्या (मंगळवारी) भारताकडून पाकिस्तानच्या १२ कैद्यांची सुटका करण्यात येणार होती.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes